अंगाला झोंबणारा थंडगार वारा, घडी घडी येणारा पाऊस आणि त्यातच चालणे थांबल्यामुळे आता थंडी वाजायला लागली होती. त्यामुळे आम्ही बालेकिल्ल्याच्या कातळ कड्याखाली आडोसा शोधला आणि तिथे विराजमान झालो. आता पर्यंत बऱ्यापैकी सर्व मंडळी सोनमाचीवर येऊन पोहोचली होती. सर्वच जण आता आडोसा शोधण्याच्या प्रयत्नात होते. आम्ही जिथे बसलो होतो. तोच बालेकिल्याकडे जाणारा रस्ता होता. आणि आम्हाला क्रॉस करून जाता-येता येत नव्हते. म्हणून आम्हीच जरा पुढे जाऊन बसलो.
ती तीच जागा जिथून बालेकिल्यावर चढायला सुरवात होणार होती. तिथे बसायला बऱ्यापैकी मोकळी जागा होती शिवाय डोक्यावर ऊंचच ऊंच कडा असल्याने तिथे पाऊस आणि गारवारा लागत नव्हता. त्यामुळे हळू हळू सगळा ग्रुप तिथे जमा झाला.
आता सगळेच चढाई सुरु होण्याची वाट पहात होते. परंतु अजुनही ट्रेकर्सचे काम उरकले नव्हते. त्यामुळे आता इथे गप्पांचा फड रंगला होता. आणि येथेच गप्पा मारता मारता थोडीशी पेट पूजेला सुरुवात झाली. बिस्किटे, चिवडा, लाडू, फळे, चॉकलेट, ड्रिंक्स असे विविध मेनू आता बॅगमधून बाहेर यायला लागले होते. ही अशी पेटपूजा चालू असताना या सर्व पदार्थांचा गंध तिथल्या स्थानिकांना(माकडे) लागला.
एक-दोन-तीन करता करता त्यांची अख्खी टोळीच्या टोळीच तिथे जमा झाली. काही प्राणीप्रेमींनी त्यांचा पाहुणचार केला. पण तेवढयाने काही त्यांचे समाधान झाले नाही. आमच्याकडून आणखी काही मिळायची शक्यता कमी झाल्यावर त्यांनी हळू हळू आमच्यावर दादागिरी करायचा प्रयत्न सुरु केला. त्यामुळे काही काळ माकडे विरुद्ध आम्ही असा खेळ रंगला.
काही छोटी छोटी माकडे आम्हाला घाबरायची पण एक मोठा पठ्या काही आम्हाला दाद देत नव्हता तो सरळ सरळ आम्हाला भिडायला पहात होता त्यामुळे काही काळ आमच्या गोटात भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे जो तो सुरक्षित जागा शोधू लागला. तेवढयात तो मोठा माकड माझ्या अगदी जवळ येऊन बसला, अगदी मांडीला मांडी लावून... तेंव्हा मात्र मला काहीही सुचायचे बंद झाले आणि मी स्तब्ध एखाद्या पुतळया सारखा बसून राहिलो.
मग मात्र आमच्या टोळीने आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यांच्यावर दगडांचा वर्षाव चालू केला अर्थात त्यांना लागणार नाही अशा पद्धतीने दगडफेक सुरु केली. आमची ही युक्ती फळास आली आणि असे एक दोन आक्रमणं परतवून लावल्यावर आमची त्यांच्या पासून सुटका झाली. आणि सर्वाना हायसे वाटले.
सकाळपासूनची पायपीट, थकवा आणणारी चढ़ाई यामुळे सगळे थकले होतेच पण काहींना मात्र दम निघला नाही त्यांनी तिथेच एक एक डुकला मारला.
आता निरोप आला की सगळी तयारी झाली आहे त्यामुळे चढायला तयार व्हा. आणि सगळयाच्या अंगात परत उत्साह संचारला. सगळे तयार झाले आणि एकदाची चढाई सुरु झालीच. आम्ही सगळ्यात आधी तिथे आलो असलो तरी आमचा नंबर आधी लागणारा नव्हता कारण आम्ही पुढे आल्यामुळे आमच्याकडे सुरक्षा साधने नव्हती आणि त्यांच्या शिवाय चढणे शक्य नव्हते. आता जे कोणी वर जातील आणि त्यांचे हार्नेस जेंव्हा खाली येतील तेंव्हाच आमचा नंबर लागणार होता.
गाळात रुतलेली गाडी, तिला काढ़ायला लागलेला वेळ, दोर बांधण्यासाठी लागलेला वेळ आणि पाईप क्रॉसिंग साठी लागणारा जास्तीचा वेळ यामुळे नियोजित वेळेपेक्षा आम्ही खुप मागे होतो.
पाईप क्रॉसिंग आधीच खुप जणांची भीतीने गाळण उडत होती. त्यामुळे क्रॉस करायला वेळ लागत होता याचा फक्त आम्ही अंदाज बांधू शकत होतो कारण तिथे नेमके क़ाय चाललय हे आम्हाला कळत नव्हते. नंतर निरोप आला की जे लांबून आले आहेत त्यांना आधी वर सोडायचे म्हणजे ते आधी खाली येऊन लवकर परतीचा प्रवास सुरु करतील.
आता जे काही वर गेले होते त्यांचे हार्नेस खाली आले होते त्यामुळे आमचा नंबर लागला होता. तेही तब्बल 4 तासाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर, सेफ्टी साहित्य चढवले आणि आमची चढाई सुरु झाली. पाईप क्रॉसिंगच्या आधी जवळ जवळ ६०-७० पायऱ्या चढून जायच्या होत्या.
त्या पायऱ्या २-३ फुट रुंद असाव्यात. एका बाजुला नजर पोहचत नव्हती इतकी दरी तर दुसऱ्या बाजुला ऊंचच ऊंच कडा त्यामुळे सगळे जीव मुठीत धरून सेफ्टी दोरला चिटकुन कासव गतीने पुढे सरकत होते. पुढे काही ठिकाणी २-३ फुट असणाऱ्या पायऱ्याही तुटलेल्या होत्या. त्यामुळे खुप काळजीपुर्वक पावले टाकावी लागत होती.
अशा ठिकाणी आमची भंबेरी उडत होती पण त्याला इलाज नव्हता. मधे मधे त्या छोट्या पायऱ्यावर बराच वेळ थांबावे लागत होते. कारण मात्र एकच पाईप क्रॉसिंगला लागणारा वेळ. जेवढा वेळ त्या पायऱ्यावर काढावा लागत होता तो मात्र नकोसा वाटत होता, डोळ्यांसमोर खोलच खोल दरी आणि वरुन आंगावर पडणार थंडगार पाणी हे आंगावर काटा आणि शहारे आणत होते.
असे करत करत ६०-७० पायऱ्या चढण्यास आम्हाला जवळ जवळ एक ते दीड तास लागला होता. आता आमच्या ग्रुप मधील पाहिला सदस्य अभिजीत पाईप क्रॉस करून गेला होता. अन आता माझा नंबर आला होता. (क्रमशः)

Post a Comment