अमर छत्तीसे
श्रीगोंदा : तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांपैकी आढळगाव जिल्हा परिषद गटात विकासाची गंगा आली आहे. ती फक्त विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पंचशीलाताई गिरमकर यांच्यामुळे आली आहे, असे प्रतिपादन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.
आढळगाव येथील गव्हाणेवाडी येथे ते बोलत होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, उपसभापती मनिषा कोठारे, आढळगाव ग्रामपंचायत सदस्य उत्तम राऊत, माजी सरपंच देवराव वाकडे, उपसरपंच अनुराधा ठवाळ, बापुराव जाधव, बळी बोडखे, अंबादास चव्हाण, अंजली चव्हाण, डॉ. अशोक वाकडे, सुजाता वाकडे, संदीप सूर्यवंशी, बाळासाहेब शिंदे, रंगा डोके, संतोष सोनवणे, गणेश शिंदे, नितीन छत्तीसे, सतीश काळे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्या पंचशीलाताई गिरमकर यांच्या माध्यमातून आढळगाव गावात सुमारे ५० लाखाची कामे मंजूर झाली. या कामांचा शुभारंभ खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, मी दक्षिण जिल्हयाचा खासदार आहे. पण सर्वाधिक विकास कामे ही श्रीगोंदा तालुक्यात होत आहेत.
कारण या तालुक्याचे लोकप्रतिनिधी कार्यक्षम आहेत. तसेच या तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांपैकी फक्त आढळगाव गटात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. या गटाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी माझ्याकडून जी मदत लागेल. ती मदत मी या गटाला करण्यास कटीबद्ध आहे, असेही खा. विखे म्हणाले.
त्याचबरोबर काही गावात विकासासाठी निधी दिला तरी खासदार. आमदार गावात आल्यावर राजकारण सूचते, असा टोलाही विखेंनी लगावला.
आज जिल्हा परिषद सदस्या पंचशीलाताई गिरमकर यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचा शुभारंभ झाला. यात मंदिर परिसरात शुशोभिकरण, गिरमकर वस्ती रस्ता डांबरीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती, पशुवैद्यकीय दवाखाना दुरुस्ती व गव्हाणेवाडी शाळा खोलीचे बांधकाम या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे.

Post a Comment