१५ ऑगस्ट २०२१ भारताचा ७५ वा स्वातंत्रदिन या वर्षी काही वेगळयाच पद्धतीने साजरा करण्याची पर्वणी निर्माण केली ती महाराष्ट्र रेंजर्स ग्रुपने मलंग गडाची मोहीम आखून. मग काय आम्ही त्वरीत नाव नोंदणी करून जागा पक्की केली.
झाली निघायची तारीख आणि वेळ ठरली ती १४ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता निघायचे आणि सकाळी पाच वाजता बेस पॉइंटला पोहचायचे. पण... पण... पण... शुक्रवारी दुपारीच कळले की शनिवारी सुट्टी आहे. मग सोने पे सुहागा मिळाल्याचा आनंद झाला अनं शनिवारी दुपारीच बारा वाजता निघायचे ठरले. जाता जाता लोणावळयामधे म्युझियम पाहून कल्याण मुक्कामी जायचे असे नियोजन केले. आणि तसे निघालो पण फक्त एक तास लेट म्हणजे दुपारी एक वाजता प्रवास चालू झाला.
शनिवारी चार वाजता म्युझियममध्ये पोहोचलो. तिथे पहायला होते जिवंत वाटणारे विविध क्षेत्रातील मेनाचे पुतळे त्यातही सर्वात मनाला भावला तो थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचा. सर्व काही हुबेहुब कान, नाक, डोळे आणि वस्र सर्व काही असे की असे भासावे जणू काही अण्णाच समोर. त्यानंतर छोटीशी पण रोमहर्षक फिल्म, भूतरस्ता, काचेचा भूलभुलय्या आणि शिवकालीन वस्तुंचे संग्रहालय हे सर्व पाहून झाल्यावर लोणावळयाच्या चिक्कीचा आस्वाद घेतला आणि पुढील प्रवास सुरु केला.
आधीच ठरल्यानुसार आम्ही कल्याणमधे राहणार होतो. त्यामुळे आम्हाला सकाळी लवकर गड पायथ्याला पोहचणे सहज शक्य होणार होते.
आम्ही बऱ्यापैकी लवकर आलो असल्याने कल्याण मधील मित्राकडे(सचिन) चहा-पाणी करून नंतर रूम करावी असे ठरले. पण जसे जसे कल्याण दृष्टिपथात येऊ लागले तसतशी रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढू लागली. वाढता वाढता इतकी वाढली की पंधरा मिनिटांवर आलेले कल्याण दोन तास झाले तरी लांब वाटू लागले कारण त्यावेळी आम्हाला अर्धा किलोमीटर जाण्यासाठी दोन तास लागले.
मग मात्र आम्ही मित्राकडचा चहापाण्याचा कार्यक्रम रद्द करून तिथेच मिळेल त्या ठिकाणी रूम करायची ठरवली. मग सुरु झाले मिशन हॉटेल बराच वेळ गेला पण लॉजिंग वाले हॉटेल काही मिळेना. शेवटी आम्ही गाडी साईडला लावून हॉटेलचा शोध घेण्याचे ठरवले आणि दुसऱ्या प्रयत्नाला यश आले.
गाडी व्यवस्थित पार्क करून रूमचा ताबा घेतला आणि फ्रेश होऊन ताटावर बसलो सकाळपासून जेवलो नसल्याने दम निघत नव्हता. घरून आणलेल्या पाच आणि तिथे मागवलेल्या दोन अशा सात भाज्या, चपात्या, आणि गरमागरम जिरा राईस आता एखाद्या राजभोजनासारखे वाटत होते. त्यामुळे त्यावर आम्ही जवळ जवळ तुटूनच पडलो होतो आणि बघता बघता सगळ्याचा फडशा पाडला होता.
आता डोळ्यावर तार यायला लागली होती शिवाय सकाळी लवकर उठायचे असल्याने आणि दिवसभर ट्रेक करायचा असल्याने आता झोपणे खूप महत्वाचे होते. त्यामुळे सकाळी चारचा गजर लाऊन लाईट बंद करून लगेच झोपी गेलो.
सकाळी चार वाजता गजर वाजला न वाजला तोच विशालसर उठून बसले. (कारण फोन साइलेंट असताना वाजला तरी ते जागे होतात) मग एकापाठोपाठ सगळे उठले आणि तासाभरात आवरून तयार झाले. चेक आउट करून आम्ही बरोबर पहाटे सव्वापाच वाजता हॉटेल सोडले आणि 30 मिनिटात गड़पायथ्याला हजर झालो.
आम्ही पोहचलो तर ट्रेकर्स टीम आमच्या आधी हजर होतीच. जाताच जयेश भेटला. पण त्याच्या चेहऱ्यावर जरा तणाव जाणवत होता. जास्तीची विचारपूस केल्यावर कळले की पुण्यावरुन येणारी गाडी गाळात फसली होती. आणि ती येण्यासाठी जवळपास दीड दोन तास लेट होणार होती. शिवाय पार्किंगवाल्या बरोबर पण व्यवाहार जुळत नव्हता.
मग आम्ही जयेशला बोललो की आम्ही पुढे निघतो. त्यानेही ते मान्य केले आणि आम्हाला चहा-नाश्ता (इडली, उडिदवडे, सांबर, चटणी) देऊन आम्हाला पुढे येऊन रस्ता दाखवला( एक किलोमीटर) आणि आमचा ट्रेक खऱ्या अर्थाने चालू झाला. (क्रमशः)

Post a Comment