समोर हिरवीगार डोंगररांग हिरव्या शालूत लपेटून उभी ठाकलेली, छातीपर्यंत वाढलेले ऊंच गवत अन् त्यात जणू लपून बसलेली निसरडी पाऊलवाट वरुन पडत असलेली पावसाची संततधार. त्याने (पावसाने) सर्व सृष्टी कशी ओलीचिंब करून टाकली होती. चालता चालता गवतावरुन ओघळणारे थंड पाण्याचे थेंब अंगावर शहारे आणत होते.
पायाखालचा न दिसणारा रस्ताही ओलाचिंब आणि निसरडा झालेला होता. शिवाय जागोजागी खड्डे असल्याने एक एक पाऊल जपून टाकत आम्ही आता डोंगराच्या चढणीला लागलो होतो. हे आमच्या फुलणाऱ्या श्वासावरुन लक्षात येत होते. चालत असताना नकळत मनात आले की या मोठ्या गवतातून एखादे जंगली जनावर समोर आले तर काय करायचे..... आणि हे मनात चालू असतानाच गवतात एक मोठी सळसळ झाली अनं छातीत धस्स झाल.
पावले जागच्या जागी थबकली तर समोर उभा होता एक भला मोठा कुत्रा. त्याच्या वागणुकी वरुन तो तिथलाच आणि माणसाळलेला असावा पण आता मात्र माझ्या जीवात जीव आला होता. अन छातीचे ठोके मात्र अजूनही जोरात पड़तच होते. इतके सगळे होऊन माझ्या मित्रांना काहीच कल्पना नव्हती कारण गवतच तेवढे होते. नंतर मात्र बराच वेळ तो कुत्रा आमच्याबरोबर चालत होता. आणि असा वागत होता जणू काही आमची रोजची ओळख असावी.
चढण वाढत गेली तशी आम्हाला जरा जास्तच धाप लागायला लागली. पण आमच्याकडे एक प्लस पॉइंट होता की आमच्याकडे खूप जास्तीचा वेळ होता त्यामुळे रमत गमत आणि विश्रांती घेत चालू शकत होतो. कारण आमची बाकीची मंडळी अजून मागेच होती आणि ती अजून बेस पॉइंटलाच आलेली नव्हती.
आमच्या मध्ये दोन नवीन तरुण मित्र होते त्यामुळे जास्त वेळा विश्रांती घ्यावी लागत होती. पण त्याची आम्हाला काहीच फिकीर नव्हती. बरीच चढण चढल्यावर समोर एक पठार दिसत होते. त्यामुळे पावलं आपोआपच झपाझप पडायला लागली होती. आता आम्ही पीरमाचीवर येऊन पोहचलो होतो.
साधारण 1000 फुट रुंद आणि 2500 फुट लांब असे मोठे पठार आमच्या समोर पसरलेले होते. पावसानेही जरा विश्रांती घेतली होती. वातावरणही स्वच्छ झाले होते. त्यामुळे बेसपॉइंट दिसत होता आणि मागची टीम चढाईच्या तयारीत असल्याचे दिसत होती. त्यामुळे आमच्याकडे अजूनही एक तास वेळ होता म्हणून आम्ही रिलॅक्स होऊन तिथल्या आडोशामध्ये अंगावरचे कपडे पिळून टाकले.
वातावरण स्वच्छ झाल्याने निसर्ग नव्या नवरी सारखा सुंदर दिसत होता. सगळीकडे हिरवेगार डोंगर, समोर पांढराशुभ्र धबधबा असे अतिशय रमणीय आणि प्रसन्न वातावरण होते. त्यामुळे आमचा थक़वा कुठच्या कुठे पळून गेला हे आम्हालाही समजले नाही.
समोर पसरलेले हिरवेगार सपाट पठार त्यामुळे अंगात मस्ती आली नाही तर नवलच. त्यामुळे तिथे सुरु झाला काठयांचा खेळ. काठी फिरवणे, काठीची लुटूपुटूची लढाई असे कारनामे सुरु झाले होते. (क्रमशः)

Post a Comment