नगर : जे सभासद कोरोना संसर्गामुळे मयत झालेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब आधार योजनेच्या शिर्षकाखाली रक्कम देणे गरजेचे असताना स्वतःचा एक रुपया न देता लाखो रुपयांचा संचालक प्रवासभत्ता, बैठकांसाठी रक्कम हडप करणाऱ्या मंडळींनी अगोदर स्वतःच्या खिशात हात घालावा. सभासदांच्या खिशामध्ये हात घालण्याचा असा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी दिला आहे.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सभा रविवार दि.29 ऑगस्टला आभासी पद्धतीने होणार आहे. मागील वर्षीच्या सभेमध्ये राज्य कार्यक्षेत्र करण्याचा तुघलकी निर्णय विद्यमान संचालक मंडळाने आणला होता. त्या तुघलकी निर्णयाला सर्व सभासदांनी जोरदार विरोध केल्यामुळे त्यावेळी सत्ताधाऱ्यांना काढता पाय घेऊन सदर निर्णय पाठीमागे घ्यावा लागला होता.
यावेळी देखील कर्ज निवारण निधी व कुटुंब आधार योजनेसाठी सभासदांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. पोटनियम दुरुस्तीनुसार प्रत्येक सभासदाच्या मयत कर्ज निवारण ठेवीमधून सात हजार रुपये कपात करून घेतले जाणार आहेत. तसेच कुटुंब आधार योजनेसाठी दीडशे रुपये वरून पाचशे रुपये कपात केली जाणार आहे. त्याचप्रमाणे सभासदांची कायम ठेव रक्कम एकोणीसशे रुपये असताना ती हजार रुपये कोणत्या वार्षिक सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन करण्यात आली.
कोणत्या सभासदांची मागणी होती. हे देखील विद्यमान संचालक मंडळ सांगू शकलेले नाही. सातत्याने गेल्या दोन वर्षापासून दर महिन्याला नियम बदलणारे संचालक मंडळ म्हणून या संचालक मंडळाचा ठसा सभासदांमध्ये उमटलेला आहे. कोणताही निर्णय घेताना दूरगामी विचार करायचा नाही, शिक्षक बँकेचे भ्रष्टाचाराचे कुरण सत्ताधाऱ्यांनी करून ठेवलेले आहे. घड्याळ घोटाळा, कर्मचारी मेहनताना घोटाळा, पाथर्डी शाखा घोटाळा असे अनेक घोटाळे करणाऱ्या संचालकांनी दोन वर्षांत दोन कोटी रुपयांची माया जमा केलेली आहे, असा आरोप प्रविण ठुबे यांनी केला आहे.
आधी भ्रष्टाचारातून खिशात घातलेला परत भरून पुण्याचे काम करावे. कोरोना संसर्गामुळे मयत झालेले सभासदांच्या कुटुंबियांना कुटुंब आधार योजनेचा लाभ देण्यासाठी रक्कम देणे गरजेचे असताना स्वतःचा एक रुपया न देता लाखो रुपयांचा संचालक प्रवासभत्ता, बैठकांसाठी रक्कम हडप करणाऱ्या मंडळींनी अगोदर स्वतःच्या खिशात हात घालावा व नंतर सभासदांच्या खिशामध्ये हात घालण्याचा प्रयत्न करावा, असे जिल्हाध्यक्ष ठुबे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
कुटुंब आधार योजना व मयत कर्ज निवारण निधी कसा द्यायचा हा प्रश्न संचालक मंडळाचा आहे. मात्र यासाठी सभासदांच्या खिशामध्ये जर संचालक मंडळ हात घालणार असेल तर या संचालक मंडळाला भविष्यामध्ये धडा शिकवण्याचे काम अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळ करेल. संचालक मंडळाचे नेतृत्व करणार्या तथाकथित नेत्याने ज्याप्रमाणे मुदतठेव व्याजदर कमी केले, त्याचप्रमाणे कर्जव्याजदर कमी करुन ८.५० टक्के करण्याचे धाडस दाखवावे.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांनी केलेल्या विविध भ्रष्टाचारासंदर्भात सहकार आयुक्तांचे निर्बंध असतानादेखील केलेल्या अवास्तव खर्चासंदर्भात अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद गुरुमाऊली मंडळांने पुणे येथे सहकार आयुक्त अनिल कवडे तसेच निबंधक आनंद कटके आणि सहनिबंधक (लेखापरीक्षण) तानाजी कवडे यांच्याकडे आज दिनांक 28 रोजी समक्ष चर्चा करून निवेदन दिले.
या संदर्भाने सहकार आयुक्त कार्यालयाकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला लेखी अहवाल मागवला जाणार आहे, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे. निबंधकांनी सूचना केल्याप्रमाणे बँकेचे विशेष लेखापरीक्षण करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. यातूनही न्याय न मिळाल्यास वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेच्यावतीने स्वतंत्र याचिका दाखल करून दाद मागण्यात येणार आहे.
त्याचबरोबर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करावी अथवा बँकेची लांबलेली निवडणूक तातडीने घ्यावी, या बाबतीत देखील अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेने उच्च न्यायालयात अॅड. गुलाबराव राजळे यांच्यामार्फत याचिका दाखल केलेली आहे.
सभासदांच्या कर्जावरील व्याजदर तातडीने कमी करुन ८.५० टक्के करावा त्याचप्रमाणे आरबीआयने 2020 मधील वाटपाला परवानगी दिली असून वार्षिक सभा झाल्यानंतर तातडीने वाटप न केल्यास शिक्षक परिषदेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच मयत सभासदांची संपूर्ण कायमठेव रक्कम, शेअर्स रक्कम संबंधित कुटुंबियांना तात्काळ द्यावी, अशी मागणी राम निकम, दत्ता गमे, रविंद्र कांबळे, सुभाष गरुड, मीनाक्षी तांबे-भालेराव, आर.पी. राहाणे, संजय शेळके, राजेंद्र जायभाय, गणपत सहाणे, बाळासाहेब मगर, संतोष खामकर, राजू इनामदार, बाळासाहेब शेळके, बाबा पवार, राजेंद्र थोरात, मिलिंद तनपुरे, प्रल्हाद गजभिव, खंडेराव उदे, श्रीकृष्ण खेडकर, अमोल लांबे, अल्ताफ शहा, शंकर गाडेकर, संजय म्हस्के, सुनिता कर्जुले आदींनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे तीन सत्ताधारी संचालकांनी अहवाल सालामध्ये बँकेच्या संचालक संचालक पदावर असताना बँकेतून वैयक्तिक लाभ घेतलेला आहे. हा महाराष्ट्र सहकारी कायद्याचा भंग तीन संचालक आणि त्याला मंजूरी देणाऱ्या संचालक मंडळाने केलेला आहे. या जबाबदार संचालकांना अपात्र घोषित करावे यासाठी गुरुमाऊली मंडळ लढा देणार आहे. - विकास डावखरे, जिल्हाध्यक्ष, रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळ, अहमदनगर

Post a Comment