वडनेर : दिव्यांगांसाठी बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये तिर्थाचीवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील साई राजेंद्र भांगरे या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे.
अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती शिक्षण विभाग अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ ऑगस्टला दिव्यांगांसाठी बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये अकोले तालुक्यातून मोठ्या संख्येने दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेचा निकाल घोषित झाला. ऑनलाइन बाल चित्रकला स्पर्धेमध्ये तिर्थाचीवाडीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीतील साई राजेंद्र भांगरे विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे.
मागील आठवड्यात या स्पर्धेचा निकाल ऑनलाईन सर्व पालक, शिक्षक, अधिकारी व पदाधिकारी यांच्या समक्ष जाहीर करण्यात आला होता.
साई राजेंद्र भांगरे याने या स्पर्धेमध्ये अकोले तालुक्यातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. साईंच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून चित्रकला स्पर्धेतील साईचे हे यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे व तसेच अकोले तालुक्यातील एक उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली तिर्थाचीवाडी शाळेच्या वैभवात भर पडणारी ही यशदायी बाब ठरत आहे.
साईच्या व शाळेच्या या यशाबद्दल अकोलेचे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, विस्ताराधिकारी संभाजी झावरे, खिरविरे केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप नवाळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय डगळे, मुख्याध्यापक दिगंबर वाकळे यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यास विशेष शिक्षिका रंजना कराळे, उपक्रमशील शिक्षक नरेंद्र राठोड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Post a Comment