नगर : दाखल गुन्हा बंद करण्यासाठी बावीस हजारांची लाच मागणार्या बेलवंडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रकाश बारवकर याच्याविरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बेलवंडी पोलिस ठाण्यात येळपणे येथील एक मिसिंग बाबतचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार प्रकाश बारवकर हा करत होता. या मिसींग गुन्ह्यात मदत करुन मिसिंग प्रकरण बंद करण्यासाठी बारवकर याने पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती.
संबधित तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने 17 सप्टेंबरला अहमदनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल केली. संबंधित तक्रारदार व आरोपी बारवकर यांच्यात तडजोड होऊन बावीस हजाराची मागणी केली व ही रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
लाच स्वीकारण्याअगोदर आरोपी बारवकर याला शंका आल्याने त्याने रक्कम स्वीकारली नाही. मात्र लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे . आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेतले आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलिस निरीक्षक पुष्पा निमसे, पोलिस हवालदार संतोष शिंदे, पोलिस नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल, रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड , चालक पोलिस हवालदार हारुन शेख, पोलिस नाईक- राहुल डोळसे यांनी ही कारवाई केली.
Post a Comment