पारनेर : स्वस्तात सोने घेण्याचा मोह एका उत्तर भारतीय व्यापार्याला चांगलाच महागात पडला आहे. पैसे तर गेले पण मारखाऊन परतावे लागले. स्वस्तात सोने देतो म्हणून चौघांनी सुपा परिसरात बोलवत परप्रांतीय व्यापार्याला व त्याच्या साथीदाराला मारहाण करत बारा लाखाला लुटल्याचा प्रकार आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला.
भुवनलाल कन्हैलाल वर्मा (रा. अलमोडी जिल्हा, उत्तराखंड) असे तक्रार देणार्या व्यापार्याचे नाव आहे. उत्तराखंड राज्यातील अलमोडा जिल्ह्यातील व्यापारी भुवनलाल कन्हैलाल वर्मा यांना दूरध्वनीद्वारे स्वस्तात सोने देण्याची तयारी नगर येथील त्या व्यक्तींनी दाखवली होती.
या व्यवहारासाठी पुणे - नगर महामार्गालगत सुपा -पवारवाडी जवळील झाडी वस्ती येथे भेट ठरली होती. त्यानुसार मंगळवारी (दि 14) दुपारी तीनच्या वाजेच्या दरम्यान वर्मा हे एका सहकार्यासोबत 12 लाख रूपयांची बॅग घेऊन या ठिकाणी आले होते. त्यांना महामार्गाच्या कडेला दोघेजण भेटेले.
त्यांनी सोने डोंगराच्या खालच्या बाजुस लपवले असून त्या ठिकाणी येण्यास सांगून डोंगराकडे नेले. त्या ठिकाणी अगोदरच तीन ते चारजण दबा धरून बसले होते. व्यापारी व त्याचा सहकारी तेथे पोहचताच सर्वांनी त्यांना घेरून पैशांची बॅग हिसकावली. वर्मा व त्यांच्याबरोबरील एकजण अशा दोघांना मारहाण करत रक्कम घेऊन पळून गेले. याबाबत व्यापारी भुवनलाल वर्मा यांनी रात्री उशीरा सुपा पोलिसांना याबाबत माहिती दिली.

Post a Comment