कर्जत : कर्जत नगरपंचायतने माझी वसुंधरा अभियान दोन अंतर्गत केलेल्या आवाहनामुळे कर्जतमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
कर्जत नगरपंचायत आणि रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ठिकठिकाणी गणेश विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलाव आणि निर्माल्य संकलनालाही चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षी कर्जत शहरात प्रथमच पूर्णपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
माझी वसुंधरा अभियान एकमध्ये कर्जत नगरपंचायतचा राज्यात दुसरा क्रमांक आला. चालूवर्षी अभियान दोनमध्ये कर्जत नगरपंचायतीने सहभाग घेतला आहे. त्या अनुषंगाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन कर्जत नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी शहरवासीयांना केले होते.
गणेश भक्तांनी घरी मातीच्या मूर्ती तयार करून वापराव्यात यासाठी शहरात चार ठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या.शहरातील गणेश मूर्तिकारांनाही त्यांनी शाडूच्या मातीच्या मूर्ती विकण्याचे आवाहन केले होते. तसेच प्रोत्साहन म्हणून शहरातील मूर्तिकारांची मदत घेऊन ५००शाडूच्या गणेशमुर्त्या ऐच्छिक किंमतीच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक घेऊन पर्यावरण स्नेही गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत नगरपंचायत आणि रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश विसर्जनादिवशी कृत्रिम विसर्जन तलाव आणि निर्माल्य संकलन करण्यासाठी शहराच्या विविध भागात हे फिरते तलाव पाठवण्यात आले होते.
यासाठी कर्जत रोटरी क्लबचे अध्यक्ष रामदास काळदाते सचिव राजेंद्र जगताप यांच्यासह सर्व रोटरी सदस्य आणि सर्व सामाजिक संघटनेचे पर्यावरणप्रेमी तसेच नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी या कालावधीत ज्ञानराज कलामंच, सातारा आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त लोक कलावंत हसनभाई पाटेवाडीकर यांच्या मदतीने लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.
पर्यावरण स्नेही गणेशोत्सवात सहभागी होऊन महिलांनी एक देशी वृक्ष लावला व त्याचे जतन केले तर मकर संक्रांतीच्या दिवशी सुस्थितीत झाडे असणाऱ्या महिलांचा लकी ड्रा काढून ५१ पैठणी देण्यात येणार आहेत.
यामुळे एक हजारापेक्षा ही अधिक झाडांची लागवड झालेली आहे. शहरातील प्रत्येक घरी जाऊन कर्मचार्यांमार्फत सर्वे करून गणपतीच्या मूर्तीचा प्रकार ,पत्ता , मोबाईल क्रमांक घेण्यात आला.
१२८७ मूर्ती विसर्जनास येणार ही माहिती उपलब्ध झाली. त्यानुसार १० ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली. विसर्जन दिवशी प्रत्येक नागरिकाला संपर्क करणे, गणपती कृत्रिम स्थळी विसर्जित करून घेणे याची जबाबदारी ३० नगर पंचायत कर्मचारी आणि रोटरी सदस्यांना वाटून देण्यात आली त्यामुळे केवळ एक अंकी आकडा वगळता सर्व मूर्ती नगर पंचायतच्या विसर्जन तलावात जमा झाल्या.
जमा झालेल्या सर्व POP मूर्तींची विल्हेवाट NCL पुणे यांच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे लावण्यासाठी दीड हजार किलो सोडियम बाय कार्बोनेट चा वापर करून एक शेततळ्यात यावर प्रक्रिया केली जात आहे. यातून मिळालेले पाणी मियाँवाकी(घनवन) फॉरेस्टला पोषक द्रव्य म्हणून वापरले जाणार असून उर्वरित घटक विटभट्टीत पाठवला जाणार आहे.
सर्व निर्माल्य स्वतंत्र गोळा करण्यात आले आहे. त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करून ते ही झाडांना वापरले जाणार आहे. एकंदरीत कोणतीही पर्यावरणास घातक गोष्ट शिल्लक राहणार नाही याची पूर्णतः काळजी घेऊन कर्जत नगर पंचायतने हा गणेशोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला आहे.




Post a Comment