नगर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतन आयोग पडताळणीसाठी जिल्हा परिषद अर्थ विभागाने पडताळणी पथक नियुक्त करावे, अशी मागणी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेतर्फे लेखा व वित्त अधिकारी धनंजय आंधळे यांच्याकडे करण्यात आली आहे.
सातवा वेतन आयोग प्रत्यक्ष बसवताना बऱ्याच पंचायत समित्यांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या वेतनामध्ये तफावती झालेल्या आहेत. या तफावती व तृटी दूर करण्यासाठी तसेच सप्टेंबर महिन्यात प्राथमिक शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा होणारा दुसरा हप्ता यामध्ये तफावत राहू नये, म्हणून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या वेतन पडताळणीसाठी जिल्हा परिषद मार्फत विशेष शिबिरे आयोजित करण्यात यावीत.
सर्व शिक्षकांची सातवे वेतन आयोगाची वेतन पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनंजय आंधळे, लेखाधिकारी कासार आणि उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू लाकूडझोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. तसेच समक्ष चर्चा केली आहे.
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी स्वतंत्र दोन पथके नेमून तातडीने प्राथमिक शिक्षकांची वेतन पडताळणी करण्यात येईल असे आश्वासन शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले. त्याचप्रमाणे बऱ्याच तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते देखील आजअखेर बऱ्याच प्राथमिक शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यावर जमा झालेले नाहीत.
याबाबत देखील फेरआढावा घेण्यात येऊन ज्या शिक्षकांची सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमा झाली नाही, त्या शिक्षकांचा आढावा घेऊन त्या प्राथमिक शिक्षकांचे हप्ते प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमा करणेबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
सहावा वेतन आयोग फरक हप्त्यांचा देखील आढावा घेण्यात येईल, असे आश्वासन संघटनेस मुख्य लेखा व वित्त अधिकारी आंधळे यांनी दिले.
शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांना सातवा वेतन आयोगाचा दुसरा हप्ता जमा करताना प्राथमिक शिक्षकांना कोणत्याही प्रकारची नादेय प्रमाणपत्र मागण्यात येऊ नये, अशी विनंती निवेदनाद्वारे शिक्षक परिषदेने केली असता शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी कोणत्याही प्रकारची नादेय प्रमाणपत्र जमा करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट आश्वासन संघटनेस दिले.
त्याचप्रमाणे याबाबत सर्व तालुका गटशिक्षणाधिकारी यांना स्पष्ट सूचना देण्यात येतील, असे आश्वासन दिले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनंजय आंधळे यांना मागणी करण्यात आली की, ज्या प्राथमिक शिक्षकांनी एनपीएसमध्ये आपले खाते उघडले आहे, त्या प्राथमिक शिक्षकांच्या गेल्या तीन महिन्यापासून पगारातून कपात केलेल्या रकमा जिल्हा परिषद मधून त्या शिक्षकांच्या एनपीएस खात्यांमध्ये जमा करण्यात आलेल्या नाहीत.
त्याचबरोबर जुन्या डीसीपीएस खात्यांवर असणाऱ्या रकमा सुध्दा जमा करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत असून डीसीपीएस शिक्षकांच्या जुन्या खात्यावरील सर्व रक्कम एनपीएस खात्यावर वर्ग करण्यात यावे, त्याचबरोबर गेल्या तीन महिन्यापासून कपात करण्यात आलेल्या एनपीएस रकमा तातडीने त्या शिक्षकांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावेत, अशी मागणी संघटनेतर्फे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
याबाबत या आठवड्यात सर्व प्राथमिक शिक्षकांचे खात्यावर वर्ग करण्यात येतील, असे स्पष्ट आश्वासन लेखा व वित्त अधिकारी धनंजय आंधळे यांनी शिष्टमंडळास दिले. यावेळी नव्याने रुजू झालेले उपमुख्य व लेखा व वित्त अधिकारी श्री राजू लाकूडझोडे यांचा संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
त्याचबरोबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके आणि परिक्षित यादव यांची पदोन्नती झाली असून त्या निमित्ताने त्यांचा देखील संघटनेच्यावतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर तसेच शिक्षक परिषदेचे राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली राज्य उपाध्यक्ष संजय शेळके, जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे, नाशिक विभागीय सहकार्यवाह बाबासाहेब पवार, राज्य प्रतिनिधी संजय म्हस्के, विकास मंडळाचे माजी अध्यक्ष संजय शिंदे, दिलीप दहिफळे, सुनिल पवळे, संतोष खामकर, रविंद्र अरगडे, संतोष सरवदे, संतोष निमसे, संजय साठे, प्रभाकर झेंडे, श्रीनिवास एल्लारम, शिक्षक परिषदेचे नगर तालुकाध्यक्ष संजय दळवी, गुरुमाऊली मंडळाचे नगर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाबळे आदी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment