नगर ः
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत सत्ता बदल झालेला आहे. हा बदल पाहून सभासद चक्रावलेले आहेत. सत्ताधारी गटात वारंवार होणाऱ्या निवडीला अगोदरच सभासद कंटाळले होते. त्यात आता बॅंकेतील दुसर्या गटाने त्यांच्यावर चाल करत सत्ता आपल्या ताब्यात घेतल्याने सभासदांनाच बॅंकेतील राजकारण नेमकं काय चाललयं हे समजेनासे झालेले आहे.
बॅंकेत सत्ता मिळविल्यानंतर सुरवातीचे तीन ते साडेतीन वर्षे बॅंकेचा कारभार सुरळीत निर्वघ्न सुरु होता. त्यानंतर रावसाहेब रोहकले सेवानिवृत्त झाल्यानंतर बॅंकेत बापूसाहेब तांबे गट वेगळा होत त्यांनी बॅंकेच्या सत्तेच्या चाव्या आपल्या ताब्यात घेतल्या. रोहकले गटाचे संचालक मग विरोधी गटावर बसले होते. या गटाने तांबे गटाच्या अनेक कामांवर आक्षेप घेत सत्ताधार्यांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
तांबे गटानेही सत्तेच्या माध्यमातून व बहुमताच्या जोरावर विरोधकांना अनेकदा नामोहरण केले आहे. या दोन गटांवर मात्र सत्तेत नसलेल्या मंडळांकडून नेहमीच आरोप-प्रत्यारोप सुरु होते. त्यातच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे बॅंकेच्या संचालक मंडळाला मुदत वाढ मिळाली. या मुदत वाढीचा फायदा बापूसाहेब तांबे यांच्या गटाला होऊन त्यांनी सहा महिन्याला अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवड प्रक्रिया केली आतापर्यंत त्यांनी पाच वेळा यशस्वी निवड प्रक्रिया करून आपल्याच गटाच्या ताब्यात सत्ता मिळविले.
सहाव्या वेळी बॅंकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रियेचा पाळणा हलणार तोच विरोधी गटाचे संचालकांनी एकत्र येत सत्ताधारी गटाला खिंडार पाडत बॅंकेतील सत्तेची चावी आपल्या हाती घेण्यासाठी त्यांनी डावपेच खेळले. या डावात ते यशस्वी होऊन त्यांनी बॅंकेची सत्ता आपल्या हाती मिळविली आहे.
सत्ताधारी तांबे गटात गेल्या काही दिवसांपासून वारंवार होणाऱ्या निवड प्रक्रियेमुळे नाराजी निर्माण झालेली होती. या वेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष कोणाला बनवायचे याचे नियोजन सुरु होते. त्यात काही संचालक मात्र विरोधी गटाशी बोलणी करून त्यांचे आगामी तिकिट निश्चित करून आपल्याच नियोजनात व्यस्त होते.
निवड प्रक्रियेत मात्र तांबे गटाला अपेक्षीत असलेले यश मिळाले नाही.
रोहकले गटाने केलेली खेळीत ते यशस्वी होऊन आपल्या संचालकाला अध्यक्षपदी
विराजमान करून ते मोकळे झाले. बॅंकेतील सत्तेची चावी विरोधकांच्या हातून
रोखले गटाने आपल्या हाती घेतली आहे. त्यामुळे तांबे गटात अस्वस्तता निर्माण
झालेली आहे. तांबे गटाची आगामी खेळी काय राहते, याकडे सर्व सभासदांचे लक्ष
लागलेले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर बॅंकेतील सत्ता रोहकले गटाच्या ताब्यात गेल्यामुळे आता तांबे गटाकडून काय व कसे नियोजन केले जाते, सत्ताधारी रोहकले गटाला आता कसे कोंडीत पकडले जाते, हे पाहणे मोठे उत्सुकतेचे राहणार आहे. या बदलाचा कोणाला फायदा होणार आहे, कोणाला तोटा होणार आहे, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. रोहकले गटाचे अविनाश निंभोरे यांना मिळालेल्या अध्यक्षपदाच्या संधीत ते सभासदांसाठी आता काय विधायक निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहकले गटाकडून बॅंकेची निवडणूक व्हावी, यासाठी न्यायालयात दाद मागितलेली आहे. त्यातच त्यांनी सत्तेची चावी आपल्या ताब्यात घेण्यासाठी खेळलेली खेळीचे गणित सर्वसामान्य सभासदांच्या लक्षात आलेले नाही. त्याविषयी आता सभासदांमध्ये चर्चा सुरु झालेली आहे. सत्तेच्या समीकरणासाठी सत्ताधारी व विरोधकांमध्ये आता आरोप-प्रत्यारोपाची फैरी तर सुरु झालेली नाही, ना असा सवाल आता सभासदांमधूनच उपस्थित होत आहे.
Post a Comment