मदत व पुनर्वसन मंत्री जिल्ह्यातील असूनही पूरग्रस्तांना अद्याप एक रुपयाही नाही


पाथर्डी ः
मदत व पुनर्वसन मंत्री जिल्ह्यातील असूनही पूरग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप एक रुपयाची ही आर्थिक मदत मिळालेली नाही. विरोधकांना शेवगाव तालुक्यातील विकास जाणिवपूर्वक दिसत नसून फक्त जनतेत संभ्रम निर्माण केला जात आहे. पाथर्डी शहरातील आक्रोश हा फक्त भूखंड माफिया व नेत्यांचा चालू आहे, अशी  टीका तनपुरे, घुले व ढाकणे यांचे नाव न घेता आमदार मोनिका राजळे यांनी केली. 

पाथर्डी शहरातील नगर परिषदेच्या तीर्थक्षेत्र विकास निधी व नगरोत्थान योजनेअंतर्गत चार कोटी 30 लाख रुपयांच्या च्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार राजळे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, मुख्याधिकारी संतोष लांडगे, पंचायत समिती सभापती सुनीता दौंड, भाजपचे नेते अशोक चोरमले, नगरसेवक रमेश गोरे, महेश बोरुडे, बजरंग घोडके, प्रवीण राजगुरू, मंगल कोकाटे, सुनिता बुचकुल, शारदा हंडाळ आदी उपस्थित होते.

आमदार राजळे म्हणाल्या की, शहराच्या विकासासाठी नगरपालिकेच्या वतीने सुनियोजित पद्धतीने काम चालू आहे. शहराचे विस्तारीकरण होत असताना विकासकामांसाठी निधी मिळवताना मोठा संघर्ष करावा लागत आहे. पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील मागील काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसला. नैसर्गिक संकटात अनेकांनी दौरे केले. फोटोसेशन केले. परंतु सरकारने आपत्तीग्रस्तांना अद्याप पर्यंत एक रुपयाची देखील आर्थिक मदत केली नाही.शासन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.

कोकण, सातारा, सांगलीच्या धर्तीवर तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत करावी. कोरोनामुळे निधी मिळण्यास उशीर झाल्यामुळे विकासकामांना विलंब झाला परंतु शहराच्या विकासाची सर्व कामे लवकरच पूर्णत्वास जातील असा विश्वास आमदार राजळे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी नगराध्यक्ष डाॅ.मृत्युंजय गर्जे म्हणाले की, राज्य सरकारकडून विकास कामांना निधी मिळत नाही.मात्र विरोधक पालिकेला व सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचत आहेत.विरोधकांना जनतेला सांगायला कुठलाही मुद्दा नसल्याने आमच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे व चुकीचे आरोप केले जात आहेत.मागील पाच वर्षात विरोधकांकडून एकही शब्द उच्चारला गेला नाही. कुठलाही आवाज उठवला गेला नाही. आता मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक बोलत आहेत. अतिवृष्टीमुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झालेला होता हे माहीत असूनही, विरोधकांनी शहरात बॅनरबाजी केली.

शहराच्या पाणी प्रश्नाची सोडवणूक करण्या ऐवजी पालिकेची अडवणूक करण्यात विरोधकांनी धन्यता मानली.पाणी योजना जिल्हापरिषदे कडे आहे. पालिकेची कोणतीही थकबाकी नाही. जिल्हा परिषदेत सत्ता त्यांची असतानाही पालिकेची बदनामी केली जात आहे.शहरातील शांतता व सुसंस्कृत राजकारण भाजपा संपवु देणार नाही असा इशाराही डॉ.गर्जे यांनी यावेळी दिला.

यावेळी पंचायत समितीचे गटनेते सुनील ओव्हळ, सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुभाष केकाण, माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, पांडूरंग सोनटक्के, शहराध्यक्ष ज्योती मंत्री, आदिनाथ धायतडक आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post