पाथर्डी ः राज्य सरकारच्या आदेशानुसार मोहटा देवस्थान
मध्ये अनेक निर्बंध कायम ठेऊन नवरात्रोत्सव होणार आहे. "नो मास्क, नो
दर्शन" या नियमांचे काटेकोर पालन करून मिरवणूक, महाप्रसाद वाटप, मंदिर
परिसरात घटी बसण्यासह सार्वजनिक उत्सवांना प्रतिबंध करण्यात आला आहे.
आगामी नवरात्रोत्सव पासून मोहटादेवी मंदिर देवस्थान खुले करण्यासाठी समितीच्या सभागृहात प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी देवदत्त केकाण तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, तहसीलदार शाम वाडकर, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, सरपंच एरिना पालवे, विश्वस्त यांच्यासह पंचायत समिती, नगरपालिका, आरोग्य विभाग, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन, वीज वितरण, पाणीपुरवठा आदी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोरोना
साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर मंदिर उघडणार असल्याने भाविकांची संख्या
मोठ्या प्रमाणावर वाढू शकते असे गृहीत धरून संरक्षण व पार्किंग व्यवस्था
करण्यात येणार आहे.
प्रांताधिकारी केकाण म्हणाले, देवी
दर्शनासाठी पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता पाथर्डी शहरातील
वाहतुकीस अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे, टपऱ्या, नवरात्रोत्सवासाठी पालिका व
पोलिसांच्या संयुक्त कारवाई द्वारे हटविण्यात येऊन भाविकांसाठी रस्ता
पूर्णपणे खुला ठेवावा.
मोहटादेवी मंदिर परिसरात खाजगी जागा मालक
पार्किंगसाठी मनमानी दर आकारून भाविकांची लूट करतात. अशा तक्रारी
नवरात्रीमध्ये वाढतात.ग्रामपंचायत,पोलिस व वन विभागाने संयुक्त निर्णय घेऊन
पार्किंगचे दर ठरवावेत. जमीन मालकांनी सहकार्य न केल्यास पंधरा दिवसांसाठी
शासनाच्या विशेष अधिकारानुसार जमिनी अधिग्रहीत करून भाविकांना पार्किंग
सुविधा महसूल विभागाने द्यावी.
नवरात्र काळात देवीच्या गाभाऱ्यात मध्ये
जाऊन दर्शन सुविधा पूर्णपणे बंद करण्यात येऊन भाविकांनी रांगेत येऊन
सामाजिक अंतराचे पालन करत दर्शन घेऊन निघून जायचे आहे. मंदिर परिसरात
खाद्यपदार्थ प्रसाद स्वरूपात वितरित होणार नाहीत.भाविकांना गडावर अथवा भक्त
निवास मध्ये मुक्काम करता येणार नाही.
पाथर्डी शहरातून देवी गडा कडे
जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर फिरते पोलीस पथक, तात्पुरती रस्ता दुरुस्ती,
मार्गदर्शक सूचनांचे फलक असतील.देवस्थान समितीने ठीकठिकाणी मंदिर परिसरात
सूचना फलक व स्वयंसेवक तैनात करावेत.शासकीय कर्मचारी, पोलिस,देवस्थान
समितीचे कर्मचारी अशा सर्वांची कोरोना चाचणी आवश्यक आहे.
लसीकरण प्रमाणपत्र
पडताळणी केली जाईल.यात्रा व अन्य उत्सवा संदर्भात शासनाकडून अद्याप पर्यंत
कोणत्याही मार्गदर्शक सूचना जारी झाल्या नसल्याने मंदिर उघडण्याबाबत
बैठकीतून विचारविनिमय करण्यात आला. नवरात्र उत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून
आलेल्या आदेशानंतर अंतिम आराखडा तयार होईल.असे केकाण म्हणाले.
देवस्थान
समितीकडे भाविकांसाठी वाहन व्यवस्था पुरेशी नसल्याने एसटी महामंडळाने
अहोरात्र बस सुविधा पुरवावी.जुन्या बस स्थानकावरून मोहटा गडासाठी गाड्या
सुटतील. नगर, नेवासे, शेवगाव आगाराच्या गाड्या प्रसंगी उपलब्ध राहतील.असे
नियोजन करण्याची तयारी एसटी विभागाने ठेवली आहे.
तहसीलदार श्याम
वाडकर म्हणाले, देवस्थान समितीने विलगीकरण कक्ष स्थापून पालिका, पोलीस व
ग्रामपंचायतीच्या संयुक्त मोहिमेतून विना मास्क भाविकां विरुद्ध दंडात्मक
कारवाई करावी.मंदिर परिसरातील सर्व व्यावसायिकांचे यात्रेपूर्वी व यात्रा
काळात कोरोना चाचणी करावी.रस्त्यावर पथारी मांडून बसणाऱ्या विरुद्ध कडक
कारवाई व्हावी.
भाविकांच्या अतिउत्साही पणामुळे मंदिरे पुन्हा बंद करण्याची वेळ येणार नाही. याची खबरदारी घ्यावी. विशेष सुरक्षा पथके पोलिसांकडून तैनात होतील. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शनासाठी खुले होत आहे.नेहमीप्रमाणे उत्सव होणार नाहीत.त्याबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन होऊनच अंतिम निर्णय होईल.
या बैठकीचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे तर आभार विश्वस्त अशोक दहिफळे यांनी मानले.
Post a Comment