नगर ः एक नंबर कांद्याचा भाव सर्वाधिक निघाला तरी प्रतवारीच्या भावात वाढ होत नाही. ही वाढ शेतकर्यांच्या हिताची नसते. त्यामुळे कांद्याच्या एक नंबर कांद्याला सर्वाधिक भाव निघाला तरी त्यातुलनेत प्रतवारीत किती भाव निघाला हे पाहूनच शेतकऱ्यांनी कांदा विक्रीचा निर्णय घेणे गरजेचे आहे, असे मत अनेक कांदा उत्पादकांनी व्यक्त केले आहे.
सध्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक आनंदीत झालेला आहे. मात्र काही ठिकाणी फक्त एक नंबरच कांद्याला सर्वाधिक भाव मिळत आहे. इतर प्रतवारी कांद्याच्या भावात वाढ होत नाही. ही भाव वाढ म्हणजे आवक वाढविण्याचे षडयंत्र असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.
कांद्याच्या एकूण चार प्रतवारी आहेत. त्यामध्ये एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर, जोड कांदा अन् गोल्टी कांदा अशी वर्ग वारी आहे. यामध्ये एक ते तीन व गोल्टी कांद्याच्या भावात वाढ झाली तर ती भाववाढ शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरते.
मात्र बर्याच वेळा एक नंबर कांद्याच्या भावात मोठी वाढ होऊन इतर प्रतवारीत भाववाढ होत नाही. त्यामुळे शेतकर्यांची फसगत होऊन कमी भावातच कांदा विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यावर येत असते. त्यामुळे शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी पाहूनच कांदा विक्री करण्याचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कांद्याला आता 2300 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी आता भाव मिळू लागला म्हणून लगेच कांद्याची विक्रीस मोठ्या प्रमाणात आणू नये. टप्प्याने कांदा विक्रीस आणल्यास सर्वांना त्याचा फायदा होईल, असेही कांदा उत्पादकांमधून मत व्यक्त होत आहे.
Post a Comment