अमर छतिसे
श्रीगोंदा ः कांद्याकडे नगदी पीक म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांचा कांद्याचे उत्पादन घेण्याकडे कल असतो. सध्या श्रीगोंदा तालुक्यातील अनेक शेतकरी कांद्याचे उत्पादन घेण्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झालेला असून श्रीगोंद्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरु झालेली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात कुकडीच्या आवर्तनाने ऐनवेळी पाठ फिरवली. त्यानंतर वरुणराजाने साथ दिली. त्यामुळे तालुक्यातील पिकांना फायदा झालेला असून काही अंशी पाण्याच्या पातळी वाढलेली आहे. वरुणराजाच्या कृपेमुळे तालुक्यातील शेतकर्यांनी य़आता कांदा लागवडीसाठी हाती घेतलेल्या आहेत.
श्रीगोंदा तालुका फक्त म्हणायला सुजलाम सुफलाम् तालुका आहे. कारण या तालुक्यातील बहुतांशी शेती हि कुकडीच्या पाण्यावर अवलंबून आहे. पण मागच्या महिन्याच्या सुरुवातीला शासनाने ओव्हर फ्लोचे पाणी सोडले असा गवगवा अनेकांनी केला पण हेच आवर्तन श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत आल्यावर अचानक बंद झाले. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता.
शेतकरी राजाला वरुणराजाने साथ दिली व कांद्याची रोपे जगली. त्यामुळे आता सध्या तालुक्यात कांदा लागवडीची लगबग सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सध्या कांदा लागवडीसाठी मजुरांची कमतरता भासू लागली आहे. त्याचबरोबर एका एकरासाठी मजुरांना सात ते आठ हजार रुपये मोजावे लागत आहेत. पण वरुणराजाने दिलेल्या साथीमुळे शेतकरी वर्ग सध्या तरी समाधानी दिसत आहे.
कांदा लागवडीला मजूर मिळत नसल्याने बाहेर तालुक्यातून मजूर आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. पारनेर, नेवासे तालुक्यातील अनेक कांदा लागवड करण्यार्या टोळ्या आता श्रीगोंदे तालुक्यात येऊ लागलेल्या आहेत. काहीजण मुक्कामी तर काहीजण त्यांच्या घरून रोज कांदा लागवडीसाठी येत आहेत.


Post a Comment