गांज्याची शेती भोवली... दोघांना जेलची हवा खावी लागली.

अमर छत्तीसे

श्रीगोंदा : तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी काही दिवसांपूर्वी गांज्याची बाग सापडली होती. आता पुन्हा श्रीगोंदा शिवारात पोलिसांनी छापा टाकून एका शेतामध्ये सुमारे नऊ लाखाचा गांजा जप्त केला आहे. 

कर्जतचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव व श्रीगोंदा पोलिसांनी संयुक्त कारवाई केला. यामथ्ये मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये गांजाची शेती करणार्‍या दोघा भावांना ताब्यात घेण्यात आले आहे.  बाळू हरी जगताप व अरुण हरी जगताप अशी दोघा भावांची नावे आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुप्त बातमीदारामार्फत पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना माहिती मिळाली की, श्रीगोंदा शिवारातील जगताप वस्ती दत्तवाडी लोखंडेवाडीमध्ये शेत जमीन गट नंबर 700, 701 यामध्ये लिंबोणीच्या झाडाचे मध्ये गांजाची लागवड केली आहे.

ही माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव व श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले व पोलिस पथक हे श्रीगोंदा शिवारातील दत्तवाडी लोखंडेवाडीमध्ये जगताप वस्ती या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता या ठिकाणी लिंबोंणीच्या शेतामध्ये गांजाची लहान-मोठी झाडांची लागवड केलेली होती.

या ठिकाणी छापा टाकून तेथे हजर असणारे दोन इसम यात अरुण हरिभाऊ जगताप (वय 56) व बाळू हरिभाऊ जगताप (वय 59, दोघे राहणार जगताप वस्ती दत्तवाडी लोखंडेवाडी, श्रीगोंदा) अशा दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले आहेत. यावेळेस पोलिस पथका समवेत कृषी अधिकारी व व्हिडीओ चित्रण त्यांनाही पाचारण करण्यात आले होते. 


या छाप्यात गांजाची लहान-मोठी हिरवेगार पाला असणारी झाडे ताब्यात घेण्यात आली आहेत. यामध्ये एकूण आठ लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत  पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलिस अंमलदार केशव व्हरकटे, सागर जंगम, दादासाहेब टाके,अंकुश ढवळे, गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, अमोल कोतकर, गणेश गाडे आदींनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post