संगमनेर : खासदार सदाशिव लोखंडे यांनी 2014 व 2019च्या लोकसभा निवडणुकीत कोणी कोणी मदत केली याची जाहीर कार्यक्रमात वक्तव्य केले. त्यामुळे खासदार लोखंडे यांना मदत करणार्यांची नावेच उघड झाली आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता पक्षश्रेष्ठी कशी दखल घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या 16 वर्षांपासून संगमनेर तालुक्यात महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळ्यात वृक्षारोपण करत दंडकारण्य अभियान राबविले जाते. आज दंडकारण्य अभियानाचा सांगता सोहळा पार पडला.
या सोहळ्याला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री विश्वजित कदम आदी उपस्थित होते. यावर्षी महाविकास आघाडी स्थापन झाल्याने दंडकारण्य सोहळ्याला शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनाही निमंत्रण देण्यात आले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अनेक गुपिते या कार्यक्रमात भाषण करताना पक्षाच्या नेत्यांपुढे उघड केली.
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत आपल्याला बाळासाहेब थोरात यांनी छुपी मदत केली. त्यानंतर 2019 ला विखेंच्या मदतीने खासदार झाल्याचे त्यांनी जाहीर वक्तव्य केले.
विखे यांच्या मदतीने खासदार झालो पण आज आई जेवू देईना आणि बाप भीक मागू देईना अशी माझी अवस्था झाली आहे, असे वक्तव्य त्यांनी सभेत करताच एकच हशा पिकला.
या कार्यक्रमानंतर मात्र दोन्ही नेत्यांवर कार्यकर्त्यांसह सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली. एकमेकांची जिरवाजिरवी करत नेते पक्षाचे नुकसान करीत असल्याचा आरोप अनेकांनी व्यक्त केला.
2014 व 2018ला थोरात व विखे यांनी मदत केली नसती तर कॉंग्रेसचा एक खासदार संसदेत वाढला असता. त्याचा काही प्रमाणात पक्षासह सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी पक्षाचा गेला असता, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
या नेत्यांच्या चुकीमुळेच मंत्री रामदास आठवले हे पक्ष कॉंग्रेसची अनेक वर्षांची साथ सोडून गेलेले आहे. अशा नेत्यांना पक्षाने वेळीच धडा शिकवणे गरजेचे आहे, असेही मत काहींनी एकमेकांशी बोलताना व्यक्त केल़्याची चर्चा आहे.
Post a Comment