नगर : गावठी कट्टा, धारदार तलवार, लोखंडी कटावनी, मिरची पावडर, लाकडी दांडक्यांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी कोतवाली पोलिसांच्या पथकाने जुन्या बसस्थानक परिसरात शिताफीने पकडली आहे.
कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे हे शुक्रवारी (दि.8) सायंकाळी पोलिस पथकासह हद्दीमध्ये गस्त घालत असताना त्यांना एका खबर्याने माहिती दिली की सराईत गुन्हेगारांची टोळी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने नगर शहरात येणार आहेत.
ते माळीवाडा बसस्थानकाजवळ इंडिका कार मधून येत आहे. तेथील त्यांच्या साथीदारांची भेट घेणार आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक शिंदे यांच्यासह उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलिस नाईक योगेश भिंगारदिवे, शरद गायकवाड, नितीन शिंदे, भारत इंगळे, सागर पालवे, दीपक रोहोकले, सुजय हिवाळे, तानाजी पवार आदींचे पथक चांदणी चौक परिसरात गेले.
तेथून माळीवाड्याच्या दिशेने एक पांढर्या रंगाची टाटा इंडिका व्हिस्टा कार येताना दिसली. या कारवर संशय बळावल्याने या पथकाने कारचा पाठलाग सुरू केला.
ही कार जुन्या बसस्थानका समोरील अंबर प्लाझा बिल्डींगच्या जवळ असलेल्या मेहेर कॉलनीकडे जाणार्या रस्त्याच्या कडेला थांबली.
त्यावेळी कार जवळ एक मोटारसायकल येवून थांबली. कारमधून दोन इसम खाली उतरले व ते मोटारसायकलवर आलेल्या दोघांशी चर्चा करू लागले. हीच सराईत गुन्हेगारांची टोळी असल्याची खात्री झाल्यानंतर कोतवालीच्या पथकाने त्यांच्यावर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले.
त्यांची व कारची झडती घेतली असता एक गावठी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, एक लोखंडी तलवार, लोखंडी कटावनी, मिरची पावडरच्या पिशव्या, लाकडी दांडके, विविध कंपन्यांचे मोबाईल असे साहित्य त्यांच्याकडे आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले.
ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना त्यांची नावे विचारली असता त्यांनी प्रविण संजय गंगावणे (वय 25, रा.गुरवपिंप्री, ता.कर्जत), मुकेश शंकर सावंत (वय 34, रा.सांगवी, ता.आष्टी), सुनील ललित थापा (वय 57, रा.भांडूप, मुंबई, हल्ली रा.घोगरगाव, ता.श्रीगोंदा), सुनील कैलास खरमाटे (वय 35, रा.पिंपळगाव टप्पा, ता.पाथर्डी), शंकर हिरामण शिरसाठ (वय 22, रा.पिंपळगाव टप्पा, ता.पाथर्डी) असे सांगितले.
या पाच जणांच्या टोळीची कसून चौकशी केली असता हे सराईत गुन्हेगार असून यातील मुकेश शंकर सावंत याच्यावर औरंगाबाद जिल्ह्यात चार व पुणे जिल्ह्यात पाच गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
Post a Comment