नगर : जुन्या वस्तूंच्या व्यापारात पैसे गुंतविल्यास परतावा दुप्पट देण्याच्या आमिषाने पाच लाख रुपयांना फसविण्यात आल्याची घटना घडली आहे.
नगर शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील डॉक्टर कॉलनी येथे ही घटना घडली. सचिन मोतिलाल कटारिया (वय 40, रा. व्यंकटेश रेसिडेन्शी, तपोवन रस्ता, सावेडी) यांना आरोपी अण्णा रावसाहेब म्हस्के (रा. डॉक्टर कॉलनी) आणि त्यांच्या साथीदारांनी जुन्या वस्तूंच्या खरेदी-विक्री व्यवसायात पैसे गुंतविण्याच प्रवृत्त केले.
या व्यवसायात पैसे गुंतविल्यास दुप्पट पैसे दिले जातील, असे आमिष दाखविले. सचिन कटारिया यांनी 24 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता म्हस्के यांना पाच लाख रुपये दिले. कटारिया यांच्या आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीनुसार आरोपी म्हस्के व त्याच्या साथीदारांविरुद्ध संगनमताने विश्वासघात करणे, फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज महाजन पुढील तपास करीत आहेत.
Post a Comment