नगर : नगरसह पुणे जिल्ह्यात घरफोड्या व दुचाकी चोरणारा सराईत आरोपी दिलीप उर्फ किरण दत्तात्रय शिंदे (वय 27, रा. नागरदेवळे, ता. नगर) याला भिंगार कॅम्प पोलिसांनी शिताफीने अटक केली.
सोनू संजय कांबळे हे बुऱ्हाणनगरमधील व्हिडिओकॉन कंपनीजवळ राहतात. सोनू कांबळे हे आठ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता घरी होते. त्यावेळेस शेजारील मनोज पगारे यांच्या बंगल्याचे कुलूप चोरटा पहारीच्या सहाय्याने तोडत होता.
सोनू यांच्या ही घरफोडी लक्षात आली. त्यांनी आरडा-ओरड केली. त्यावेळेस चोरटा हा बंगल्याच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून कंपनीच्या रस्त्याने पळाला. सोनू आणि शेजारील लोकांनी त्याचा पाठलाग केला.
सोनू कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी आरोपीचे वर्णन पोलिसांना सांगितले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध सुरू करण्यात आला होता.
बेल्हेश्वर मंदिर परिसरात एक तरुण संशयास्पद फिरत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने जाऊन संशयित तरुणास पकडले.
त्याने आपले नाव दिलीप उर्फ किरण शिंदे (वय 27, रा. नागरदेवळे) असे सांगितले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने घरफोड्या आणि दुचाकी चोऱ्यांची कबुली दिली. भिंगारच्या हद्दीत त्याने चार घरफोड्या केल्या आहेत.
शिरुर आणि वानवडी (पुणे) हद्दीत दोन चोऱ्या केल्या आहेत. पाथर्डी आणि तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन चोऱ्या केल्या आहेत. त्याने घरफोडीतील सोन्याचे दागिने काढून दिले आहेत.
Post a Comment