अमर छत्तीसे
श्रीगोंदे : पगार सरकारी घेऊन नेत्यांच्या घरी कामं करण कितपत योग्य आहे, अशी चर्चा सध्या समाज माध्यमावर केली जात आहे. चुकीची सुरु झालेली पध्दत नेमकी कधी बंद होणार असा सवाल अनेकांनी समाज माध्यमांवर व्यक्त केला आहे.
सरकारी नोकर म्हणून अनेकजण नोकरीला लागतात. त्यानंतर संबंधीत नेत्यांच्या जवळ जातात. सुरवातीला अशी मंडळी नेत्यांना भाऊ, दादा, काका, मामा, साहेब करून छोटे मोठे सुट्टीच्या दिवशी कामे करून आपण किती कार्यक्षम आहोत, हे दाखवून देतात.
अशी पुढे पुढे करण्याची कामे ही मंडळी सुरवातीला सुट्टीच्या काळात व कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर करतात. त्यातून संबंधित नेत्यांचे लक्ष वेधून घेण्याचे कामकाज ते करत असतात. एकदा नेत्याचा विश्वास बसला की मग ते त्यांचे मूळ काम बाजुला ठेऊन नेत्याचे खासगी स्वीय सहाय्यक होऊन बसतात.
हे पद मिळविण्यासाठी सुरवातीला नेत्यांच्या जवळ असलेल्या काल्यकर्त्यांची मदत घेतात. एकदा का ते नेत्यांच्या जवळ गेले की ज्यांची सिडी करून ते नेत्याजवळ गेले त्यांना बाजुला दूर करण्यासाठी प्रयत्न करतात. एकदा का विश्वासातील मंडळी नेत्यापासून दूर गेली की मग यांचे अधिराज्य चालू होते.
पगार सरकारी अन् कामकाज नेत्यांच्या खासगी स्वीयसहाय्यक म्हणून ते करत असतात. महिन्यातून एकदा किंवा दोनदा हजेरीसाठी ते जात असतात. इतर वेळी नेत्याच्या कार्यालयात किंवा घरीच ते काम करीत असतात. हे कामकाज करीत असताना गावातील व इतर आपले हेवेदावे त्या माध्यमातून काढून घेतात. आपल्या विरोधकांची खासगी स्वीयसहाय्यक पदाच्या माध्यमातून जिरवण्याचे कामही ते करून टाकतात.
असे प्रकार फक्त नगर जिल्ह्यात नव्हे संपूर्ण राज्य व देशात सुरु आहे. ही बाब मात्र नेते मंडळींच्या लक्षात येत नाही. पूर्वी असे प्रकार नव्हते. नेते मंडळींकडे स्वीयसहाय्यक हे पट्टीचे असायचे. कोण भेटायला आले कोण नाही आले. कोणाचे काय काम होते. कोठे काय बोलायचे कोणाला भेटायचे, कोठे गायचे याची इत्तमभूत नोंद ठेऊन ते लक्षात आणून देत.
नेत्याकडून भाषणात जर चुकून एखादे वाक्य बोलण्याच्या ओघात गेले तर ते चुकीचे असे चिठ्ठीपाठवून सावध करण्याचे कामकाज स्वीयसहाय्यक मंडळी करत होती. आताची मंडळी नेत्याची चूक होऊनही त्यांच्या लक्षात येत नाही. तिचा बागुलबुवा झाला की त्याच्या विरुध्द मतप्रवाह नेत्यांचा करून त्यांना चुकीचे मार्गदर्शन करीत असतात.
काहीजण तर स्वीय सहाय्यक म्हणून काम करताना स्वत:चा जादा व नेत्याचा कमी स्वार्थ पहातात. काहीजण तर नेत्यांच्या नावाखाली स्वत:च्या पाहुण्यांकडे ये जा करून भाऊं, दाताचे काम होते सांगून आपली कामातून सुटका करून खासगी भेटी करतात. याचा सर्व खर्च मात्र नेत्यांच्या पैशावर करत असतात.
याबाबत सध्या समाज माध्यमावर चांगलीच चर्चा सुरु झालेली आहे. या चमचेगिरी शासकीय कर्मचार्यांमुळे मात्र अनेक बेरोजगार व हुशार तरुणांना रोजगारापासून वंचित रहावे लागत आहे. तसेच नेत्यांचे त्यामुळे नुकसान होऊन विकास कामात खीळ बसत आहे. हा प्रकार गेल्या वर्षांपासून मोठ्या प्रमाणात फोपावला असून त्याला पायबंद घालण्याची मागणी होत आहे.
लोकशाहि असिच आहेका ते कळतच नाय मला
ReplyDeletePost a Comment