डॉक्टर विपुल डे यांच्या खूनातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

 अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : कौठा (ता. श्रीगोंदा) येथील डॉक्टर विपूल डे यांचा चार एप्रिल 2017ला  संशयावरून खून करून पुरावा नष्ट केला. या प्रकरणातील आरोपी संभाजी महादेव थोरात (वय ५२ वर्षे रा. कौठा ता. श्रीगोंदा) यांना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ल  यांनी जन्मठेपेची व दंडाची शिक्षा सुनावली.


या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून अँड. अनिल घोडके यांनी काम पाहिले. या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, डॉ. विपुल डे हे कौठा गावात वैद्यकीय व्यवसाय व पशुपालनाचा व्यवसाय करत होते. त्यांनी चार्यासाठी खंडाने शेतजमीन घेतली होती. सदरची शेती आरोपीच्या शेतीजवळच होती.

चार एप्रिल २०१७ ला डॉक्टर विपूल डे हे चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. ते रात्री नऊ वाजेपर्यंत परत न आल्याने त्यांची पत्नी सुप्रिया डे यांनी गावातील लोकांचे मदतीने शोध घेतला. परंतु ते मिळून आले नाही. 

त्यामुळे पाच एप्रिल २०१७ला  गणपत परकाळे यांनी हरवल्याबाबत खबर श्रीगोंदा पोलिस स्टेशनला दिली होती.

त्यानंतर गावातील लोकांनी पाच एप्रिलला शोध घेतला. त्यावेळी आरोपीच्या शेतीपासून काही अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला.

त्यानंतर मृतदेहाची परिस्थिती पाहून श्वानपथक बोलावले असता ते आरोपीच्या घरी गेले. त्यावरून मयताची पत्नी यांनी पोलीस स्टेशनला आरोपी विरुध्द तक्रार दिली. सदर केसचा तपास पी. एस. आय सोने यांनी घेतला, आरोपी अटक केल्यानंतर आरोपींना गुन्हा केल्याची जागा दाखविली. 

तसेच गुन्हा करताना वापरलेला दगड काढून दिला. तसेच गुन्हयाच्या वेळी अंगावर असलेले व घरात धूवून लपवून ठेवलेले रक्ताचे कपडे काढून दिले. सदर बाबींचे व्हिडीओ रेकॉर्डींग सुध्दा केले होते.

सदरचे केसचा तपास करून त्याचे विरुध्द दोषारोप येथील न्यायालयात पाठविले. सदरचे केसमध्ये सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्ता अँड. अनिल घोडके यांन काम पाहिले. त्यांना म.पो.कॉ. खामकर यांनी मदत केली.

सदरच्या केसची चौकशी येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. एन. जी. शुक्ल साहेब यांचे समोर झाली. यात सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदार फिर्यादी, पंच, डॉक्टर सुनिल बेलोटे, आदींच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

सदर प्रकरणात आरोपी यास भा.द.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेप व दहा हजाराचा दंड, दंड न भरल्यास एक वर्षे सक्तमजुरी तसेच भा.द.वि कलम २०१ प्रमाणे सात वर्षे व तीन हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली दोन्ही शिक्षा एकत्रीत भोगायच्या आहेत, अशी माहिती सरकारी वकील अनिल घोडके यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post