माणिकदौंडीच्या सरपंचपदी सीमा पठाण...

पाथर्डी : तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या माणिकदौंडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सीमा शायद पठाण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.


सरपंचपदासाठी सीमा पठाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने अध्यासी अधिकारी तथा माणिकदौंडीच्या मंडळाधिकारी वैशाली दळवी यांनी त्यांची सरपंचपदी निवड झाल्याचे घोषित केले. तलाठी राजू मेरड,वसंत वाघमारे,ग्रामसेवक बी. के. तिडके आदिनी निवड प्रक्रियेसाठी सहकार्य केले.

या निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच यांच्यासह सर्वच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक व माजी पंचायत समिती सदस्य विष्णूपंत पवार, बिलाल पठाण, यासीन पठाण, मधुकर धावड, मिट्ठू शेळके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

जानेवारी २०२१  मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत समीर पठाण यांच्या परिवर्तन ग्राम विकास पॅनलने अकरापैकी आठ जागा मिळवून ग्रामपंचायतमध्ये दणदणीत विजय मिळवला होता. मात्र सरपंच पद हे महिला सर्वसाधारण असल्यामुळे समीर पठाण यांना सरपंच होता आले नाही. त्यांच्या पॅनलमध्ये पाच महिला सदस्य निवडून आल्या होत्या.

पॅनलच्या बैठकीत सर्वांना संधी देण्याचे ठरल्यानुसार माणिकदौंडी गावचे ज्येष्ठ नेते पोपट पठाण यांच्या सुनबाई लिजवाना दिलावर पठाण यांना प्रथम संधी देण्यात आली. त्यांचा कालावधी १५ ऑगस्ट २०२१ रोजी समाप्त झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंचपद रिक्त झाले होते. त्यामळे नवीन सरपंच निवडीसाठी पदाधिकाऱ्यांची आज सभा बोलविण्यात आली होती.

निवड प्रक्रिया अत्यंत शांततेत व बिनविरोध पार पडली. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन विकासकामे करण्यासाठी प्रयत्नशील राहुन माणिकदौंडी ग्रामपंचायतीचा नावलौकिक वाढवू, असे नवनिर्वाचित सरपंच सिमा पठाण यांनी सरपंचपदी निवड झाल्यावर प्रतिक्रिया दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post