पुन्हा एकदा बॅंकेवर दरोडा...

बुलडाणा ः भारतीय स्‍टेट बँकेवर दरोडा टाकल्याची घटना आज (30 ऑक्टोबर) सकाळी समोर आली आहे. ही घटना  केळवद येथे घडली असून दरोडेखोरांनी बँकेच्या तिजोरीतून 20 लाखांची रोकड लंपास केली आहे. 


बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील केळवद येथील भारतीय स्‍टेट बँकेच्‍या शाखेवर मध्यरात्री दरोडा पडल्याची घटना घडली. सकाळी शिपाई बँकेत आल्यानंतर बँकेत दरोडा पडल्याची माहिती समोर आली. 

दरोडेखोरांनी जवळपास 20 लाखाची रोकड लुटून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरोड्याची माहिती मिळताच बुलडाणा येथून वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्‍थळी दाखल झाले. पोलिस श्वानपथकाद्वारे दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

दरोडेखोर बँकेच्या इमारतीचे खिडकीचे गज वाकवून बँकेत शिरले आणि त्यांनी बँकेतील तिजोरी गॅस कटरने कापून रोकड पळविली. जेव्हा सकाळी शिपाई बँकेत आला तेव्‍हा खिडकीचे गज वाकवले गेल्याचे पाहून त्‍याला चोरीचा संशय आला. त्‍याने ही बाब बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितली. 

अधिकाऱ्यांनी बँकेत येत पाहणी करुन तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन  तपासाला सुरुवात केली. यावेळी श्वान पथकाने बँकेच्‍या बाजूच्‍या शेतापर्यंत माग घेतला. तेव्हा तिथे दरोडेखोरांचे हँडग्‍लोज अन् बॅटरी मिळून आली. 

दरम्यान, सीसीटीव्‍हीत दोन दरोडेखोर कैद झाल्याची शक्‍यता आहे. तर या घटनेमुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पोलिसांनी या दरोड्याच्या तपासाचे चक्रे फिरवली असून लवकरच दरोडेखोर अटक केले जातील, असे सांगितले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post