पावसाची नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शक्यता

मुंबई : थंडीची चाहूल आता लागलेली आहे. राज्यातील अनेक भागात नागरिकांना थंडीने आपला कडकडाट दाकविला आहे. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटू लागलेल्या आहेत. त्यातच पुन्हा पावसाचे संकट उभे राहिलेले आहे. एक ते तीन नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.


एक ते तीन नोव्हेंबर दरम्यान दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक ते तीन नोव्हेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा सांगली जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सोलापुरात 3 नोव्हेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

एक व दोन नोव्हेंबरला राज्यात दक्षिण कोकणात व दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जने सह पावसाची शक्यता आहे. तीन नोव्हेंबरला नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

चार ते दहा नोव्हेंबर एक कमी दाबाचे क्षेत्र द-पू बंगालच्या उपसागरात तयार होत आहे. ते जास्त तीव्र न होता पश्चिमेच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. सहा ते अकरा नोव्हेंबर दरम्यान याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा दक्षिण भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो. महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post