पारनेर : तालुक्यातील जवळे परिसरात 17 ऑक्टोबरला अल्पवयीन मुलीवर निर्घृण अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. अज्ञात गुन्हेगाराने हे कृत्य केले असून पोलिसांना अजून आरोपी सापडलेला नाही. त्यामुळे संबंधित कुटुंबिय दहशतीखाली असून आम्हाला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी या कुटुंबियांना केली आहे.
ही घटना घडून पंधरा दिवस उलटले असले तरी आरोप सापडलेले नाहीत. गुन्ह्याची उकल झाली नसल्याने अत्याचार व हत्या झालेल्या मुलीच्या वडिलांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन पाठविले आहे.
घटना घडून इतके दिवस उलटले असले तरी पारनेर पोलिसांना आरोपी सापडलेले नाहीत. पोलीस फक्त पाच संशयितांचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठवले असून त्याचे अहवाल अजून प्राप्त न झाल्याचे सांगत आहेत. पोलिस आमच्या घरी येऊन चौकशी करून जातात मात्र त्यांना आरोपी सापडत नाहीत.
ग्रामस्थ विशेषतः महिलांच्या मध्ये संतापाची भावना आहे. गावातील सरपंच,तरुण उपोषणावर ठाम आहेत, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपी लवकरच सापडतील असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी उपोषण स्थगित ठेवले आहे.
मात्र आता घटनेला इतके दिवस उलटूनही आरोपी सापडत नसतील तर आम्ही कुटुंब जिल्हा पोलिस आधीक्षक कार्यालया समोर आत्मदहन करू असा इशारा निवेदनात दिला आहे.
निवेदनात कुटुंब सध्या भीतीच्या आणि दहशतीच्या सावटाखाली असून आरोपी जो पर्यंत सापडत नाहीत तो पर्यंत कुटुंबाला पोलीस सरंक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच काही मोठे लोकं हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तर करत नाही ना अशी शंका संबंधित नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
Post a Comment