सातारा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्यपाल या वक्तव्यामुळे पुन्हा वादात सापडले आहेत. शिवप्रेमींकडून त्यांच्यावर टीका होत आहे. राज्यपालांवर खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील टीका केली आहे.
उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले आहे की, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या, तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांचा संदर्भ देऊन चुकीचा इतिहास सांगितला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत असल्याचे उदयनराजेंनी म्हटले आहे.
खर तर आपल्या पदाची मर्यादा ठेवून राज्यपालांनी वक्तव्य करायला हवे होते. शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना त्यांच्या वक्तव्यामुळे दुखावल्या आहेत. तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, असे उदयनराजेंनी म्हटले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असे वक्तव्य केले आहे. आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला गुरू मिळाला, तो यशस्वी होतो, असेही कोश्यारी म्हणाले. औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. राम मंदिर कार्यक्रम सुरू असताना, मला समर्थ रामदासांचे नाव आठवत होते. शक्तीची सर्वत्र पूजा होते. वेळोवेळी देशात संतांचे कार्य दिसले आहे.
शक्ती सर्वकाही असल्यामुळे शक्तीची आराधना केली जाते. आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला सद्गुरू मिळाला, तो यशस्वी होतो. चाणक्याविना चंद्रगुप्तांना कोण विचारेल? समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारणार? असे राज्यपालांनी म्हटले आहे.
आपल्या जीवनात गुरुचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल असल्याचेही ते म्हणाले. नोट आणि वोटच्या पलिकडे जाऊन समाज आणि पुढील पिढी चांगली घडवली पाहिजे. माजी आमदार, खासदारांना कोणी विचारत नसल्याचेही ते म्हणाले.
Post a Comment