शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग... क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश

राहुरी : अहमदनगर जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्यामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी पुणे, औरंगाबाद व मुंबईस जातात. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब रुग्णांना आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अखिल भारतीय क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी १८ एप्रिल २०२१ ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांच्यासह आपले सरकारच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबईचे संचालकांकडे मागणी केली होती.


जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले तर अनेक रुग्णांना तज्ञ डॉक्टरांतर्फे आधुनिक उपचार, नवीन तपासणी यंत्रणेद्वारे अचुक निदान व कर्करोग निदान व इतर आजारांसंबंधी उपचार इत्यादी अनेक सुविधा जिल्ह्यातच प्राप्त होतील. 

त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने वैद्यकीय महाविद्यालय असते तर अनेक कोरोना रुग्णांना या ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊन रुग्णांची हेळसांड थांबली असती. त्यामुळे भविष्यातील धोके लक्षात घेऊन अहमदनगर जिल्ह्यात लवकरात लवकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.

यानंतर अहमदनगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालय निर्मितीसाठी संबंधित विभागाकडून हालचालींना सुरुवात झाली. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार अहमदनगरला १५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुगणालयाच्या निर्मितीकरिता जागेची पाहणीसाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ४ प्राध्यापकांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली होती.

या समितीने अहमदनगरला येऊन सध्याचे जिल्हा रुग्णलय, दैनंदिन रुग्णसेवा, संभाव्य वैद्यकीय महाविद्यालायासाठी लागाणरी जागा याचा अभ्यास करून नगरला वैद्यकीय महाविद्यालय करावे की नाही याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करायचा होता. 

त्या अनुषंगाने ही समिती दि. २४ जानेवारी २०२२ रोजी अहमदनगला येऊन संभाव्य वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या बाबींचा अभ्यास व जिल्हाधिकारी यांनी दाखविलेल्या जागेची पहाणी करून या संदर्भात सकारात्मक स्वरुपातील अहवाल संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना सादर केला असल्याचे सूत्रांकडून समजते.

वैद्यकीय शिक्षण हे खाते महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाकडे असल्याने जिल्ह्यातील जेष्ठ नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीसाठी पाठपुरवा करावा, जेणेकरून जिल्ह्यातील रुग्णांना विविध प्रकारचे उपचार आपल्याच जिल्ह्यामध्ये घेता येईल, इतरत्र जिल्ह्यात जावे लागणार नाही. अशी मागणीही क्रांतीसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post