नागपूर : किमान समान कार्यक्रमाच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकारने काम केलेले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारवर नाराज आहे. जरी महाविकास आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोडली, तरी आम्ही भाजपकडे लगेच जाऊ असे होऊ शकत नाही.
भाजपने चांगले काम केले असते, तर त्यांच्यापासून दूर झालोच नसतो, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.
भूसंपादनाच्या पाच पट मोबदल्याचा कायदा केंद्र सरकारने दोन पटीवर आणला. कर्जमाफी-पिकविमा, दिवसा वीज हे महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा काढण्यासाठी कारणीभूत ठरु शकतात. तसेच ऊस उत्पादकांच्या एफआरपीचेही राज्य सरकारने तुकडे केल्याचेही स्वाभिमानीचे मत आहे.
शेट्टी म्हणाले की, गेल्या आठवड्यातही महाविकास आघाडी सरकारवर राजू शेट्टींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, महाविकास आघाडी सरकारमध्ये जाण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय सामुदायिक होता.
महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षात समीक्षा करण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडी ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर तयार झाली, त्याचे काय झालं? अनेक मुद्दे खटकणारे आहेत.
नवीन धोरण राबवताना संवादही साधला नाही. या सगळ्या गोष्टींची समीक्षा येत्या पाच एप्रिलला करणार आहोत. त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ, असे राजू शेट्टी म्हणाले होते.
Post a Comment