लग्नाचा ‘बार’ उडण्याआधी हळदी कार्यक्रमात नवरदेवाचा गोळीबार...

अंबाजोगाई : लग्नाचा ‘बार’ उडण्याआधी नवरदेवाने हळदीच्या कार्यक्रमात जल्लोषात येऊन नृत्य करताना चक्क हवेत गोळीबार केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी नवरदेवासह पाच जणांवर गुन्हा नोंद केला अन् लग्नाच्या बेडीत अडकून २४ तास होत नाहीत तोच नरवदेवावर पोलिसांंचीही बेडी पडण्याची वेळ आली आहे.


शनिवारी रात्री अंबाजोगाईतील केज रोडवर असलेल्या एका मंगल कार्यालयात बालाजी भास्कर चाटे (रा. साकूड, ता. अंबाजोगाई) या तरुणाचा हळदी समारंभ होता. हळदी समारंभ पार पडल्यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास बालाजीने जमलेल्या मित्रांसोबत डीजेच्या तालावर ठेका धरला. 

थोड्याच वेळात आनंद ओव्हरफ्लो झालेल्या बालाजी आणि त्याच्या मित्रांनी जवळील पिस्तुले काढली आणि हवेत गोळीबाराच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली. कोणीतरी याचा व्हिडिओ केला आणि बघता बघता हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. 

याबाबत माहिती मिळाल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी पोलिस नाईक गोविंद येलमाटे यांच्या फिर्यादीवरून बालाजी चाटे, शेख बाबा (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) व इतर तिघांवर अवैधरीत्या पिस्टल हातात घेऊन इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post