नवी दिल्ली : युद्धामुळे शेअर बाजारात हो असलेल्या चढउतारामुळे गुंतवणूकदारांचा ओढा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांत देशाची सोने आयात ७३ टक्क्यांनी वाढून ४५.१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मागणी जास्त असल्याने सोन्याची आयात वाढली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोन्याची आयात २६.११ अब्ज डॉलर होती. मौल्यवान धातूची आयात फेब्रुवारी २०२२मध्ये ११.४५ टक्क्यांनी घसरून ४.७ अब्ज डॉलरवर आली आहे.
पहिल्या ११ महिन्यांत सोन्याच्या आयातीत वाढ झाल्याने देशाची व्यापार तूटही वाढली आहे. व्यापार तूट २०२१ २२च्या पहिल्या ११ महिन्यांत १७६ अब्ज डॉलर झाली आहे, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ८९ अब्ज डॉलर होती.
चीननंतर भारत हा सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. ज्वेलरी उद्योगासाठी सोने प्रामुख्याने आयात केले जाते. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर या पहिल्या नऊ महिन्यांत आणि दागिन्यांची निर्यात ५७.५ टक्क्यांनी वाढून ३५.२५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
आरबीआयच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत देशाची चालू खात्यातील तूट ९.६ अब्ज डॉलर किंवा जीडीपीच्या १.३ टक्के होती.
Post a Comment