अमर छ्त्तीसे
श्रीगोंदा : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आढळगाव गटात विकासात्मक कामे करण्यात आलेली आहे. ही सर्व कामे या गटातील मतदारांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून संधी उपलब्ध करून दिल्यामुळेच करता आली आहे.
गटात राजकारणाऐवजी आपण पाच वर्षात विकास कामे केली असल्याने गटाचा कायापालट झाला आहे, अशी माहिती आढळगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्य पंचशीलाताई गिरमकर यांनी दिली.
गिरमकर म्हणाल्या की, राजकारण हा माझा पिंड नव्हता. पण स्व. सदाशिव पाचपुते व ज्येष्ठ नेते लक्ष्मण नलगे यांच्या आग्रहाखातर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. माझ्या गटातील जनतेनेही मला भरभरून मते देत गटाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.
हे क्षेत्र माझ्यासाठी नवखे होते पण सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या कामकाजाची माहिती समजून घेतली. त्यानंतर गटातील गावात अंगणवाडी ,रस्ते ,पाणी विजेचा प्रश्न मार्गी लावण्यास सुरुवात केली.
माझ्या गटातील देशपातळीवर पारितोषिक मिळविलेले प्राथमिक आरोग्य केंद्र आढळगाव येथे असून या आरोग्य केंद्रात कर्मचारी वसाहत दुरुस्ती ,आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर गटात शाळांसाठी वर्ग खोल्या बांधण्यात आल्या.
गटाचा विकास हेच ध्येय समोर ठेवून जिल्हा परिषदेतून निधी मिळवला वेळप्रसंगी जिल्हा परिषदेत बंडही पुकारले. त्यामुळे निधी मिळविता आला. पाच वर्षात आपण ज्या गटाचे प्रतिनिधित्व करतो त्या गटाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून सर्वच गावात कामे केली आहेत.याचे समाधान वाटते. आज तालुक्यातील काष्टी पाठोपाठ आढळगाव जिल्हा परिषद गटात सर्वात जास्त निधी मिळवून दिला आहे.
या पाच वर्षात मी आपल्या गटातील नागरिकांची नाळ तुटू दिली नाही. प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला. यात माझे पती रमेश गिरमकर यांचीही साथ लाभली. परंतु त्यांनी कधीच कामकाजात हस्तक्षेप केला नाही. ते स्वतःचा व्यवसाय सांभाळून गटात सक्रिय राहिले. त्यामुळेच पाच वर्ष पूर्ण करताना समाधान वाटत आहे असे गिरमकर म्हणाल्या.
Post a Comment