नगर : पारनेर तालुक्यातील नंदकुमार झावरे पाटील पतसंस्थेच्या ढवळपुरी शाखा कार्यालयाचे शटर तोडून चोरट्यांनी संस्थेतील ९५ हजार ९६४ रुपयांची रोकड लांबविली. ही घटना चार ते पाच मार्चच्या रात्री घडली असून, संस्थेचे कर्मचारी विनायक महादू झावरे यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदकुमार झावरे पाटील पतसंस्थेची ढवळपुरी येथे शाखा आहे. चार मार्चला सायंकाळी पाच वाजता या शाखेच्या कार्यालयाचे नियमित कामकाज संपल्यानंतर शटर बंद करून त्यास कुलूप लावण्यात आले होते.
त्यावेळी संस्थेच्या ड्रॉव्हरमध्ये ९५ हजार ९६४ रुपयांची रोकड होती. पाच मार्चला सकाळी संस्थेच्या कार्यालयाचे शटर तोडल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पारनेरचे पोलीस निरीक्षक घनःश्याम बळप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. विनायक झावरे यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, झावरे पाटील पतसंस्थेच्या शेजारीच असलेल्य पारनेर ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी आत प्रवेश करून तेथेही चोरी करण्याच प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वाघ हे करीत आहेत.
Post a Comment