पाथर्डी : शहरातील श्री त्रिलोक जैन विद्यालयातून शालेय पोषण आहार व वजनकाटा असा मिळून ५२ हजार रुपयांचा माल चोरीस गेला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. या संदर्भात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री त्रिलोक जैन विद्यालयात असलेल्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. विद्यालयाच्या परिसरात असलेल्या तंत्र विभागाच्या शेजारील गोदामात हा माल ठेवण्यात आला होता.
मात्र, शुक्रवारी रात्रीतून अज्ञात चोरट्यांनी गोदामाचे कुलूप तोडून आत असलेला तांदूळ, मूगडाळ, मटकी व तीन इलेक्ट्रिक वजनकाटा असा एकूण ५२ हजारांचा ऐवज लंपास केला.
या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, विस्ताराधिकारी अनिल भवार, केंद्रप्रमुख राजदं बागडे यांनी भेट दिली. विद्यालयातील पर्यवेक्षक विजय गजकुमार घोडके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment