अमर छत्तीसे
श्रीगोंदा : तालुक्यातील पुर्व भागातील मोठ्या गावाच्या शेजारी उत्तर भागात असणाऱ्या छोट्या गावातील विविध विकास कामांच्या कार्यक्रमावर आमदार बबनराव पाचपुते गटाच्या कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला आहे.
श्रीगोंदा तालुक्यात भाजपचे आमदार बबनराव पाचपुते आहेत, पण राज्यात सत्ता महाविकास आघाडीची आहे. पालकमंत्री राष्ट्वादीचे आहेत. त्यामुळे विकासकामांसाठी आमदार निधी, जिल्हा नियोजन समितीमधील निधी मिळविण्यासाठी प्रत्येक गटाचा कार्यकर्ता प्रयत्न करत असतो.
पण सध्या काही गावात विद्यमान आमदारांना डावलून अथवा कार्यक्रम पत्रिकेत दुय्यम स्थान देऊन कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. असाच कार्यक्रम श्रीगोंदा शहराच्या जवळ असणाऱ्या एका छोट्या गावात झाला आहे.
जरी कार्यक्रम पत्रिकेत आमदार बबनराव पाचपुते यांचे नाव असले तरी या छोट्या गावातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
निधी विद्यमान आमदारांचा व उद्घाटने इतरांच्या हस्ते असल्यामुळे आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे, असे माजी सरपंच व माजी चेअरमन यांनी सांगितले.
Post a Comment