अमर छत्तीसे
श्रीगोंदा : कोरोनाकाळात आशा सेविका, आरोग्य सेविका, स्वच्छता कर्मचारी यांचे कार्य गौरवशाली आहे. स्त्रीचे अनेक रूपे आहेत. स्त्री ही पत्नी, बहीण व ईश्वराचा आत्मा जिच्यामध्ये वसलेला असतो ती आई असते, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश मुजीब एस. शेख यांनी केले.
श्रीगोंदा तालुका विधी सेवा समिती, वकील संघ व पंचायत समितीतर्फे येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व स्वच्छता कर्मचारी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल १११ स्त्रियांचा मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये.दिवाणी न्यायाधीश स्वाती गणपत जाधव, विधिज्ञ भगिनी, स्वच्छता कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर- अनाथलयाचे कर्मचारी अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या महिलांचा समावेश होता.
सुरुवातीला पाच भगिनींना त्यांच्या पतीदेवाने ओवाळणी करुन त्यांच्या कार्याचा गौरव व पत्नीविषयी आदरभाव व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा न्यायाधीश मुजीब एस. शेख यांनी केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश नितीन शुक्ल, दिवाणी न्यायाधीश जी.एम.साधले, एन. एस. काकडे, एच. जे. पठाण, सहदिवाणी न्यायाधीश स्वाती ग.जाधव, तहसीलदार मिलिंद कुलथे, गटविकास अधिकारी गोरख शेलार, एकात्मिक बालविकास अधिकारी विनोद लोंढे, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, वकील संघाचे अध्यक्ष अँड. दत्तात्रय झराड, मुख्याधिकारी मंगेश देवरे, प्राचार्य ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य सतीष सूर्यवंशी, तालुका आरोग्याधिकारी नितीन खामकर व अधिकारी, विधिज्ञ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी महेश घुले, सी. व्ही. व्यवहारे, सचिन जाधव, सचिन देवकाते, सुनिल सरवदे, देविदास छत्तीसे व इतर न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. वकील संघाचे अध्यक्ष अँड. दत्तात्रय झराड यांनी आभार मानले.
Post a Comment