पीएफएमएस प्रणालीला मुदतवाढ द्यावी...शिक्षक समितीची मागणी

नगर : पीएफएमएस प्रणालीद्वारे जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या सर्व शाळांना देण्यात आलेला निधी 31 मार्च अखेर खर्च करण्याबाबत आदेशदिल्याने तसेच पीएफएमएस प्रणालीमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणीचे निराकरण होत नसल्याने खर्च करण्यास शाळांना एप्रिल अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. 


या बाबत  अर्थमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, संचालक एमपीएसपी मुंबई,( समग्र शिक्षा ),मुख्य कार्यकारी अधिकारी , मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना ई-मेल द्वारे दिलेल्या निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पीएफएमएस प्रणालीची प्रक्रिया मार्चअखेरीस सुरू केल्याने मुख्याध्यापक व शाळांची प्रचंड धांदल उडाली आहे. 

याबाबतचे परिपूर्ण ज्ञान नसल्याने तसेच सदर साइटवर प्रचंड ताण आल्याने पीएफएमएस प्रणालीद्वारे खर्च केला जाऊ शकत नाही. शाळा स्तरावर करावयाच्या कामांसाठी बँकेशी संलग्न असणारे पुरवठादार मिळणे कठीण आहे. त्यामुळे शाळास्तरावर आवश्यक असणाऱ्या बाबीसाठी खर्च करताना बंधने येत आहेत. 

त्यामुळे ऐनवेळी खर्च कसा करावा, या विवंचनेत मुख्याध्यापक आहेत. त्यासाठी या प्रक्रीयेला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

शासनाची आर्थिक अनियमितता टाळण्यासाठी तसेच अखर्चित निधी शासनाला सुलभरीत्या परत घेण्यासाठी पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच पीएफएमएस प्रणाली सुरू केली आहे. तथापि ही योजना चांगली असली तरीही पुरेसा वेळ न दिल्याने तसेच तांत्रिक अडचणी न सोडविल्याने पीएफएमएस प्रणाली शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

निवेदनावर शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर ,रा. या. औटी, जिल्हाध्यक्ष संजय धामणे, नितीन काकडे ,सुदर्शन शिंदे , भास्कर नरसाळे, संजय नळे, सिताराम सावंत , वृषाली कडलग, सुनिल बनोटे, राजेंद्र ठाणगे, इमाम सय्यद, सुनील नरसाळे, सुखदेव मोहिते, प्रल्हाद साळूंके, दशरथ देशमुख, अशोक कानडे ,शिवाजी रायकर,रघुनाथ लबडे, प्रताप पवार, बाळासाहेब कल्हापुरे  आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


पीएफएमएस प्रणालीचे स्वागतच आहे. तथापि ही प्रणाली नवीन असल्याने त्यासाठी पुरेसा वेळ शिक्षकांना देणे तसेच याबाबतचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. ज्यांची रक्कम मार्चअखेरपर्यंत खर्च होणार नाही. त्यांची रक्कम शासनाने परत न घेता त्यांच्या खर्चास मुदतवाढ देणे आवश्यक आहे. - भास्कर नरसाळे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अहमदनगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post