कोपरगाव : तालुका दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार शासकीय यंत्रणा शेतातील रस्ता खुला करीत असताना एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून घेत शासकीय अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जात रस्ता खुला करण्यास विरोध केला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथे सोमवारी (ता. ४) सकाळी अकराच्या सुमारास घडली.
याप्रकरणी प्रभारी मंडळ अधिकारी गणेश महादेव गर्कळ याच्या फिर्यादीवरून हर्षल चांगदेव रहाणे, सचिन गोपीनाथ रहाणे, एकनाथ संतू रहाणे, हौसाबाई चांगदेव रहाणे (सर्व रा. मढी बु. ता. कोपरगाव) यांच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मढी बुद्रुक येथील येथील एका शेतामधील रस्ता खुला करण्याकरिता रस्ताची मोजणी करून चुना पावडर टाकून खुणा करून घेतल्या.
त्यानंतर जेसीबी मशीनच्या साह्याने रस्ता खुला करीत असताना हर्षल रहाणे हा मंडळ अधिकारी गणेश गर्कळ यांच्या अंगावर धावून येत मी रस्ता खुला करू देणार नाही, असे म्हणत जेसीबीखाली आडवा झोपला.
तितक्यात सचिन रहाणे, एकनाथ रहाणे, हौसाबाई रहाणे हे गर्कळ यांच्या अंगावर धावून आले. हर्षल याने खिशात आणलेल्या प्लास्टिकच्या बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून घेतले. पेटवून घेण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment