नगरमध्ये जागा उपलब्ध न झाल्यास राहुरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीसाठी विचार करा...

राहुरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास अहमदनगर शहरात जागा उपलब्ध होत नसेल तर राहुरी तालुक्यात महाविद्यालय निर्मितीसाठी विचार करावा, अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे ई- निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करण्याचे ठरविले आहे. अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असुन येथे डॉक्टर व वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. 

त्या अनुषंगाने संचालनालयाच्या १७ डिसेंबर २०२१ च्या कार्यालयीन आदेशान्वये अहमदनगरमध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० खाटांच्या रुग्णालयाची निर्मिती करणे शक्य आहे किंवा कसे याबाबत शक्यता पडताळणी करण्याकरीता संचालनालय स्तरावर जिल्हानिहाय अभ्यास समिती गठीत करण्यात आली होती. 

उक्त समितीने अहमदनगर येथे व्यक्तीश: उपस्थित राहून राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालयाची निर्मीती करण्याची शक्यता पडताळणी करुन त्याबाबतचा अहवाल संचालनालयास २७ जानेवारी २०२२ अन्वये सादर केला आहे. 

समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाची एकुण ७.४६ एकर जागा उपलब्ध असून रुग्णालयाच्या परिसरातील १० किमी. अंतराच्या परिघातील उर्वरीत कमीत कमी १३ एकर जागा उपलब्ध झाल्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांनुसार तेथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरु करणे शक्य असल्याचे अभिप्राय नोंदविले आहेत. 

तसेच सदर जागा उपलब्ध होण्याबाबत समितीने आपली प्रत्यक्ष भेट घेऊन जागा उपलब्ध करुन देणेबाबतही विनंती केलेली आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध करुन द्यावयाची जागा रुग्णालयाच्या परिसरातील १० किमी. अंतराच्या परिघातील कमीत कमी १३ एकर असावी असे नमूद केले आहे. 

समितीने सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने अहमदनगर येथे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय निर्मीती करण्याबाबतचा सर्वसमावेशक प्रस्ताव शासनास मान्यतेस्तव सादर करण्याची कार्यवाही संचालनालय स्तरावर सुरु आहे.

भविष्यात अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन शक्य आहे. राहुरी शहर हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती आहे. राहुरी तालुक्याबरोबर जिल्ह्यातील इतर रुग्णांना उपचारांसाठी ये-जा करण्यासाठी सोयीचे आहे. त्याचबरोबर मुळा धरण तालुक्यात असल्याने पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. 

समितीच्या अहवालातील जागेच्या त्रुटीची पुर्तता होत नसेल तर राहुरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीसाठी विचार करावा, अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, संत सावता माळी युवक संघाचे अध्यक्ष सचिन गुलदगड, सुनिल गुलदगड, सुरेशराव म्हसे, संदीप ओहोळ, जालिंदर शेडगे, नवनाथ ढगे, शेखर पवार, जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, मुकुंदमामा काळे, जिवन गुलदगड, शामराव अंत्रे, श्याम कदम, संदीप उंडे, सचिन गागरे, भगवान पेरणे, भाऊसाहेब पवार, सोमनाथ वने, हर्षद धोंडे आदींनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post