शिक्षण विभाग, सीएसआर व सामाजिक संस्था यांनी शिक्षणावर एकत्रित काम करण्याची गरज...

नगर : शिक्षण विभाग,सीएसआर फंड व सामाजिक संस्था यांनी शिक्षण क्षेत्रात एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी  केले...


विकास सहयोग प्रतिष्ठान मुंबई, प्लॅन इंडिया व  ईटॉन यांच्या माध्यमातून अहमदनगर एमआयडीसी परिसरातील दहा शाळांमध्ये बालस्नेही शाळा निर्मितीसाठी सुरू असलेल्या मॉडेल स्कूल प्रोजेक्ट अंतर्गत दहा शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, संस्था प्रतिनिधी व शिक्षण विभाग यामध्ये समन्वय निर्माण होऊन एकत्रितपणे या प्रक्रियेला पुढे घेऊन जाता यावे या हेतूने अहमदनगर येथे सहविचार सभेचे आयोजन केले होते. त्यात ते बोलत होते.

कडूस म्हणाले की, शाळा विकासात शिक्षकांची भूमिका, शासनाच्या शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या  विविध योजना, सीएसआर फंड व सामाजिक संस्था यांचे शिक्षण विकासातील योगदान महत्वाचे आहे.  तसेच आदर्श शाळा निर्मितीसाठी लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा असून त्यामधून आदर्शवाद शाळा निर्माण होऊ शकतात असे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाची भूमिका व प्रास्ताविक विकास सहयोग प्रतिष्ठानचे राज्य कार्यक्रम व्यवस्थापक राहुल खडसे यांनी केले तर प्लान इंडियाच्या शिक्षण समन्वयक गीता कुमारी यांनी मॉडेल स्कूल प्रकल्पाची गरज व पार्श्वभूमी मांडली. 

या  सहविचार सभेत ईटॉन इंडिया फाऊंडेशनचे  सीएसआर समन्वयक  टायटस जोसेफ यांनी कंपनी मार्फत सुरू असलेल्या शिक्षण क्षेत्रातील विविध कामांची माहिती देताना अहमदनगर एमआयडीसी परिसरातील शाळांच्या विकासासाठी संसाधनांची उपलब्धता करण्यासाठी काय करता येईल यावर मार्गदर्शन केले. या सहविचार सभेत मॉडेल स्कूल प्रोजेक्ट अंतर्गत गेल्या तीन वर्षात झालेल्या कामाचे सादरीकरण विकास सहयोग प्रतिष्ठान चे जिल्हा प्रकल्प अधिकारी दिलीप खांडरे यांनी केले.

या सहविचार सभेत  सहभागी सदस्यांची शिक्षण तज्ज्ञांच्या उपस्थितीत गटचर्चा आणि शिक्षण क्षेत्रातील विविध  प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या गट चर्चेत माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हासचिव  आप्पासाहेब शिंदे, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यसंघटक राजेंद्र निमसे, मुख्याध्यापक सीताराम  कोरडे, लियाकत देशमुख, बाबा गोसावी , रामदास दरंदले, पोपट धामणे, शिवाजीराव घाडगे, अमोल मुरकुटे यांचेसह उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी सक्रिय सहभाग घेतला. 

संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन राहुल खडसे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार  विकास सहयोग प्रतिष्ठान चे शिक्षण तज्ञ  संदीप धोटे यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास सहयोग प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन सुर्वे, विकास सहयोग प्रतिष्ठानचे राज्य व्यवस्थापक राहुल खडसे ,शिक्षण तज्ञ संदीप धोटे, अहमदनगर जिल्हा प्रकल्प अधिकारी दिलीप खांडरे  ,समुदाय समन्वयक रामेश्वर राऊत व भारती मात्रे तसेच इतर पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post