वाळू भोवणार.... वाळूची तस्करी झाल्यास तलाठी अन् सर्कल यांच्यावर निलंबनाची कारवाई...

नगर : राज्यात अवैध वाळू तस्करी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, याबाबत कठोर पावले उचलण्याचे निर्देश यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. बेकायदेशीर वाळूबाबत गैरप्रकार हाेत असेल तर, संबंधित गावातील तलाठी, सर्कल यांना निलंबित केले जाईल, तसेच संबंधित तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असा इशारा राज्यातील वाळू तस्करीवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला.


जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टी, पीक नुकसान याबाबत आढावा बैठक पार पडली. बैठकीनंतर महसूलमंत्री विखे यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. 

महसूलमंत्री विखे म्हणाले, राज्यातील वाळू तस्करी कदापी खपवून घेतली जाणार नाही. सध्या अनेक ठिकाणची लिलाव प्रक्रिया थांबली आहे. वाळूच्या लिलाबाबत येत्या महिनाभरात धोरण निश्चित करून निर्णय घेतला जाईल. राज्यात लम्पीबाबत लसीचा कोणताही तुटवडा नाही. राज्यात आजमितीला ३६ लाख २९ हजार लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात ७५ लाख लसी उपलब्ध आहे.

राज्यातील ३० जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव आहे. बाधित पशुधनाची राज्यातील संख्या १९,१६० इतकी आहे. नगर जिल्ह्यात आजपर्यंत १६५८ पशुधन बाधित झाले आहे. यापैकी ५४ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नऊ लाख १५८ पशुधन लसीकरणास योग्य आहे. 

यापैकी जिल्ह्यातील सहा लाख ५१ हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यातील पशुसंवर्धन विभागात पशुवैद्यक व इतर अनेक पदे रिक्त आहेत .येत्या महिन्याभरात पदांची भरती प्रक्रिया विभागीय आयुक्तांच्या पातळीवर सुरू करण्यात येणार आहे. 

बाधित झालेल्या पशुधनाचे उपचारासाठी कॅम्प सुरू करण्याची मागणी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली आहे. कॅम्प सुरू करण्यास सामाजिक संस्था कोणी पुढे येत असतील, तर त्याबाबत परवानगीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post