श्रीगोंदा : जूनपासून संततधार पाऊस सुरू असून आजपर्यंत श्रीगोंदा तालुक्यात 157 टक्के पाऊस पडला आहे. आॅक्टोबर महिन्यातही जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सडली असून उर्वरित पिके आता राहणार नाहीत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून एकरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांनी केली आहे.
श्रीगोंदा तालुकसह नगर जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकर्याच्या डोळ्यात पाणी आहे. त्यामुळे शेतकर्यांना 50 हजार रुपये एकरी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.
आता मुख्यमंत्री शेलार यांच्या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवाळीच्या आत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाल्यास शेतकर्यांना सणाचा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे ओला दुष्काळ जाहीर केला नाहीतर दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यासह श्रीगोंदा तालुक्यातील शेतीचे सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली आहे.

Post a Comment