अमर छत्तीसे
श्रीगोंदा : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा या कारखान्याने गाळप हंगाम 2021-22 मध्ये उत्पादित झालेली साखर एमएसपी पेक्षा कमी भावात विकलेली आहे.
त्यामुळे कारखान्याच्या सभासदांनी संचालक मंडळाची चौकशी करावी, दोषी संचालक मंडळ बरखास्त करून, प्रशासक नेमण्याची मागणी कारखान्याचे सभासदांनी प्रादेशिक सहसंचालक साखर अहमदनगर यांच्याकडे केली आहे.
14 फेब्रुवारी 2019 चे भारत सरकारचे राजपत्र, उपभोगता मामले खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार 31 रुपये प्रति किलो पेक्षा कमी भावात साखर विक्री कारखान्यास करता येणार नाही,असा भारत सरकारचा आदेश असून सुद्धा, तो आदेश डावलून एमएसपी रू प्रती किलो 31 रू पेक्षा कमी भावाने नागवडे कारखान्याने साखर विकली आहे.
पांढरी साखर 424780 क्विंटल प्रति किलो रू 1.36 एम.एस.पी. पेक्षा कमी भावाने विकल्याने 5,78,76,275 रू कमी आले आहेत.
तसेच कच्ची साखर एमएसपी पेक्षा 70 पैशांनी कमी भावाने विकल्याने 307726 क्विंटल साखरेचे 2,16,23,996 रू कमी आलेले आहे.
केंद्र शासनाचा आदेश डावलून नागवडे कारखान्याच्या संचालक मंडळाने परस्पर एमएसपी पेक्षा कमी भावाने साखर विकल्याने कारखान्याचे 8 कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे.
केंद्र शासनाच्या आदेशाचे पालन केले नसल्याने कारखान्याचे सभासद संदीप नागवडे,भाऊसाहेब पवार, जितेंद्र मगर, सिद्धेश्वर नांद्रे, बाळासाहेब पवार, प्रशांत शिंदे,हौसराव परकाळे व इतर सभासद यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर अहमदनगर यांच्याकडे संचालक मंडळाची चौकशी करावी, त्यानंतर संचालक मंडळ बरखास्त करून कारखान्यावर प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेत नागवडे कारखान्याच्या चेअरमन साहेबांनी साखर पावसात भिजली म्हणून कमी भावात विकल्याचे उत्तर दिले. पावसात भिजलेली साखर कोणत्या देशात निर्यात केली जाते.- भाऊसाहेब पवार.

Post a Comment