नाशिक : सारथीच्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून विभागातील मराठा व मराठा -कुणबी समाजातील तरूणांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. तरूणांचे भविष्य घडविण्याचे उदात्त धोरण अंगिकारणाऱ्या ‘सारथी’ ला सर्वतोपरी मदत शासनामार्फत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
छत्रपती शाहू महाराज, संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ‘सारथी’ पुणे च्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र किशोर दराडे, दिलीप बनकर, ॲड. राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, छत्रपती संभाजीराजे भोसले, सारथीचे अध्यक्ष मधुकर कोकाटे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी.,पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल, सारथी चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, उपवियवस्थापकीय संचालक नितीन गावंडे तसेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराजांच्या विचार, प्रेरणेतून सर्वसामान्य लोकांच्या मनातले कल्याणकारी शासन म्हणून आम्ही वचनबद्ध आहोत. त्यादृष्टिनेच काम करत आहोत. मराठा समाजातील तरूणाईला कौशल्य विकासाचे धडे देण्याबरोबरच त्यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि अर्थिक विकास होण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम सारथीच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे.
नाशिक येथे उभारण्यात आलेले ‘सारथी’ चे हे कार्यालय केवळ एक शासकीय वास्तू नसून ते अनेक तरूणांच्या भविष्याचे शिल्पकार असलेली प्रेरणा आहे. छत्रपती शाहू महाराजांचा राजमुकुट हे सारथीचे बोधचिन्ह असून ते दीनदुबळ्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढायची प्रेरणा देणारे चिन्ह आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
Post a Comment