नेवासा : नेवासा तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणी दौऱ्यात वाळूउपसा करणाऱ्या दोन लोखंडी बोटी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनीच पकडून दिल्या.
बोटी निदर्शनास आल्यानंतर मंत्री विखे यांनी वाहनांचा ताफा थांबवून जिल्हाधिकाऱ्यांसमोरच स्थानिक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बोटी जप्त करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
महसूल मंत्री विखे यांनी रविवारी दुपारपासून नेवासा तालुक्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा सुरू केला. प्रवरासंगमकडून थोड्या अंतरावर असलेल्या मंगळापूर येथे एका वस्तीवर मंत्री विखे यांना दोन लोखंडी बोटी उभ्या असलेल्या दिसल्या.
त्यांनी तातडीने वाहनांचा ताफा थांबवून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार रूपेश सुराणा या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन वस्ती गाठून बोटीची चौकशी सुरू केली. यावेळी वस्तीतील रहिवाशांचीही तारांबळ उडाली.
मंत्र्यांनी प्रश्नांचा भडीमार करून बोटीची चौकशी सुरू केली. अधिकाऱ्यांना धारेवर धरून इतक्या दिवस या बोटी जप्त का झाल्या नाहीत? या प्रश्नांवर सर्व स्थानिक अधिकारीही निरुतर झाले.
तातडीने तहसीलदार व प्रांताधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश महसूल मंत्री विखे यांनी दिले. ज्याची वस्ती आहे त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल करावा, अशा सूचना त्यांनी पोलिस निरीक्षकांना दिल्या.

Post a Comment