नगर : कांद्याचे वाढलेले भाव अवघ्या १० दिवसांत गडगडून ते दोन ते अडीच हजारांच्या घरात आले आहेत. गुरूवारी नेप्ती बाजार समितीत झालेल्या लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला १९०० ते २६५० रूपये भाव मिळाला.
दिवाळीनंतर कांद्याची आवक कमी झाल्याने नेप्ती बाजार समितीत २९ ऑक्टोबरच्या लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला ३१०० ते ३८०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. चाळीत कांदा शिल्लक नसल्याने हे भाव आणखी वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच कांद्याचे भाव खाली येत राहिले.
गुरूवारी (ता. १०) नेप्ती बाजार समितीत झालेल्या लिलावात ७९ हजार ५०४ गोण्यांची आवक झाली. त्यात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला १९०० ते २६५० रुपये भाव मिळाला. तसेच द्वितीय प्रतवारीला १३०० ते १९००, तृतीय प्रतवारीला ८०० ते १३००, तर चतुर्थ प्रतवारीला ३०० ते ८०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. केवळ दहा दिवसांत कांद्याचे दर क्विंटलमागे एक हजार ते बाराशे रूपयांनी गडगडले.
Post a Comment