नगर : लग्न हळदीच्या कार्यक्रमात विनापरवाना सार्वजनिक रस्ता आडवून लाईटींग व डिजे लावल्याने नवरदेवासह डीजे, लाईटींगच्या मालकाविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार तनवीर शेख यांनी फिर्याद दिली आहे. तपोवन रोडवरील थ्री डी कॉर्नर येथे गुरूवारी रात्री ही घटना घडली.
नवरदेव सागर गुंड (वय 26 रा. तपोवन रोड), डीजे मालक अक्षय राजु कर्डिले (वय 28 रा. निर्मलनगर, सावेडी), लाईटींगचे मालक सागर दत्ता इंगळे (रा. बालिकाश्रम रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सागर गुंड याच्या हळदी कार्यक्रमासाठी तपोवन रोडवरील थ्री डी कॉर्नर येथे सार्वजनिक रस्ता बंद करून लाईटींग व डीजे लावण्यात आला आहे, अशी माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती.
माहिती मिळताच उपनिरीक्षक समाधान सोळुंके, अंमलदार शिरसाठ, सचिन जगताप, वसिम पठाण, वाकचौरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सदर ठिकाणी रस्त्याच्या मधोमध विनापरवाना डीजे स्पीकर व लाईटींग लावून सार्वजनिक रस्ता अडविल्याचे पोलिसांच्या लक्ष्यात आले. पोलिसांनी तत्काळ डीजे बंद करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या नवरदेवासह डीजे व लाईटींग मालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment