पारनेर : सुपा येथील एका पान दुकानावर पुणे येथील कैफ मन्यार व त्याच्या सहकाऱ्यांनी कोयते दाखवत पान दुकानाची मोडतोड केली. एकावर कोयत्याने हल्ला करून जखमी केले. सुपा पोलिसांनी एकास अटक केली आहे.
समीर जब्बार सय्यद (रा. सुपा) यांनी सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अहमदनगर-पुणे महामार्गावर सुपा (ता.पारनेर) गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दरवेश हॉटेल जवळील हिरा मोती पान दुकानाजवळ काही तरूण थांबले होते.
ते तेथे जवळच लघूशंका करू लागले. प्रवाशी तरूण व स्थानिक तरूण याच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी ते प्रवाशी शिवीगाळ करत पुण्याच्या दिशेने निघून गेले, पुन्हा अर्ध्या तासाने पुणे जिल्ह्यातील गुन्हेगार कैफ मन्यार हा आपल्या सहकाऱ्यांसह तेथे आला.
तेव्हा त्याच्या जवळ कोयता, लाकडी दांडके होते. तो आल्यानंतर त्यांनी पान दुकानात तोडफोड केली. दुकानातील समीर सय्यद व साजिद शेख यांना मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी साजिद शेख यास स्थानिकाच्या मदतीने जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
सुपा पोलिसांनी तात्काळ पुण्याच्या दिशेने आरोपींचा शोध सुरू केला. या घटनेतील मुख्य आरोपी कैफ मन्यार यास रांजणगाव गणपती येथे अटक केली. त्यास रात्रीच सुपा पोलिस ठाण्याला हजर केले. समीर सय्यद यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलिसांनी सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अंमलदार संदीप चौधरी पुढील तपास करीत आहेत.
Post a Comment