काँग्रेसचा विचार हा आपला विचार....

संगमनेर : काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. विधानपरिषदेच्या राजकारणात आपल्याला भाजपमध्ये नेऊन पोहोचवले. भाजपच्या तिकीटाचे वाटपसुद्धा करून टाकले. काही लोक गैरसमज पसरवण्याचं काम करत आहेत. 


काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. आपली पुढील वाटचाल त्याच विचाराने होणार आहे, असे आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

सत्यजीत तांबे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरच खळबळजनक आरोप केले. नाना पटोले यांच्याकडून नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. थोरात-तांबे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले गेल्याचे व त्याची स्क्रीप्ट लिहिली गेली, असे आरोप सत्यजीत तांबे यांनी नाना पटोले यांच्यावर केले होते. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मागच्या महिन्याभरात सत्यजीत तांबेंवरून झालेल्या राजकारणावरून मौन सोडले आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांनी नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधला. या कार्यक्रमात बोलत असताना बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या मनातली खदखद बोलून दाखवली.

थोरात म्हणाले की, सत्यजीत तांबे चांगल्या मताने विजयी झाले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. जे राजकारण झालं ते व्यथित करणारे आहे, ही वस्तूस्थिती आहे. माझ्या भावना काँग्रेस पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे, कुठे बाहेर बोललं नाही पाहिजे, या मताचा मी आहे. 

पक्षपातळीवर आणि माझ्या पातळीवर आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.एक महिना संगमनेर तालुक्याच्या जनतेपासून दूर राहिलो, असा माझा कोणताच कालखंड नाही. मागच्या एका महिन्याच्या कालावधीत खूप राजकारण झालं. 

सत्ताबदलानंतर संगमनेर तालुक्यावर राजकारण होताना दिसत आहे. अनेक कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. संगमनेरमधील कार्यकर्त्यांचे उद्योग व्यवसाय बंद पाडण्यासाठी नाही ते प्रयत्न केले जात आहेत. 

विकासाचं सुरू असलेलं काम बंद पाडण्याचा प्रयत्न होत आहे. संघर्षातून संगमनेर तालुका मोठा झालाय, सत्ता आपणही बघितली, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post