अमर छत्तीसे
श्रीगोंदा : तालुक्यात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा दौरा असला की, त्यांची स्वतःची यंत्रणा राबतात. त्यांनी नेमलेले समन्वयक हे आमदार पाचपुते विरोधी भूमिका घेताना नेहमीच दिसत असल्याचा आरोप केला जात आहे. या भूमिकेमुळेच गावोगावी वादाची परिस्थिती निर्माण होत आहे. याकडे स्वत : खासदारांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली.
नगर दक्षिणमध्ये विकासाची गंगा आणणारे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा चांगला नावलौकिक आहे. तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही तालुक्यात जिल्हा नियोजनमधून मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. या निधीच्या बाबतीत आमदार बबनराव पाचपुते गटाला माहिती मिळत नाही.
विरोधी गटाला माहिती मिळत असल्यामुळे पाचपुते गटात नाराजीचा सूर दिसतो. याचाच प्रत्यय काष्टी येथे खासदार यांना आला आहे. काष्टीतील गावनिहाय बैठकीत कार्यकर्त्यांनी ज्ञानेश्वर विखे यांच्या विरोधात तक्रारीचा पाढा वाचला होता. आज लोणी व्यंकनाथ येथे शिवीगाळपर्यंत प्रकरण गेले. हे नेमके कशामुळे झाले याचाही शोध खासदारांनी घेणे गरजेचे आहे.
अशीच परिस्थिती बहुतांश गावांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे खासदारांनी नेमलेले खास दूत "माऊली " यांना पायबंद घालणे गरजेचे आहे, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.
सध्या तालुक्यात खासदार विखे तालुक्याच्या दौर्यावर आल्यानंतर ठराविक विखे समर्थक वाहनात दिसतात. आमदार पाचपुते यांच्या कार्यक्रमात हे कार्यकर्ते कुठेच दिसत नाहीत. जिल्हा परिषद सदस्य अथवा पंचायत समिती सदस्य यांना कोणत्याही कामांची माहिती नसते. याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत दिसून येईल, अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.
विखे गटाचे कार्यकर्ते आमदार पाचपुते गटाला विचारात घेत नाहीत तर आमदार पाचपुते गटाचे कार्यकर्ते ही लोकसभा निवडणुकांमध्ये आ. पाचपुते यांचा आदेश न मानण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या वादाचा परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसून येतील, असे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
Post a Comment